मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जुलै 2025
मुंबई, – विलेपार्ले येथे राहणार्या एका व्यावसायिकाच्या घरातून सुमारे 20 लाखांचे गोल्ड कॉईनसह अडीच लाख रुपयांची कॅश चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन जुहू पोलिसांनी त्यांच्या घरातील मोलकरीण राजेश्वरही देवेंद्र हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मनिष जयंतीलाल तुरखिया हे व्यावसायिक असून ते विलेपार्ले येथील जेव्हीपीडी स्किम परिसरात राहतात. त्यांचा ऑटोमोबाईल स्पेअर पार्टचा व्यवसाय आहे तर त्यांची पत्नी एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांची आई 85 वर्षांची वयोवृद्ध असल्याने त्यांनी घरी राजेश्वरी देवेंद्र हिला घरकामासाठी ठेवले होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी गुंतवणुक म्हणून गोल्ड कॉईन खरेदी केले होते. ते सर्व कॉईन त्यांनी त्यांच्या बेडरुमच्या कपाटात ठेवले होते. मंगळवारी 22 जुलैला ते कपाटातील तिजोरी उघडली असता त्यांना त्यात गोल्ड कॉईन दिसले होते. तसेच त्यांनी तिजोरीत अडीच लाखांची कॅश ठेवली होती.
ही कॅशदेखील गायबहोती. 50 ग्रॅम व 20 ग्रॅम वजनाचे प्रत्येकी दोन गोल्ड कॉईन आणि अडीच लाख रुपयांची कॅश असा सुमारे वीस लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबत त्यांनी त्यांच्या वयोवृद्ध आईसह पत्नी आणि मुलीकडे विचारणा केली, मात्र त्यांना गोल्ड कॉईन आणि कॅशबाबत काहीच माहिती नव्हती. राजेश्वरी ही साफसफाईसाठी सर्व रुममध्ये जात असल्याने तिनेच 11 जुलै ते 22 जुलै या कालावधीत कपाटातील तिजोरीतून गोल्ड कॉईन आणि कॅश चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी तिच्याविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राजेश्वरी देवेंद्र हिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच तिची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.