बसची स्कूटीला धडक लागून पिता-पूत्राचा मृत्यू

काळाचौकी येथील अपघात; बसचालकास अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – बसची स्कूटीला धडक लागून झालेल्या अपघातात पिता-पूत्राचा मृत्यू झाल्याची घटना काळाचौकी परिसरात घडली. मृतांमध्ये पवनकुमार साहू (४०) आणि नितीन पवनकुमार साहू (१९) यांचा समावेश आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी बसचालक अरविंद रामचंद्र हुमणे याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याची लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केली.

हा अपघात मंगळवारी सकाळी अकरा वाजता काळाचौकी येथील जी. डी अंबेकर मार्गावरील ज्योती टॉवर इमारतीसमोर झाला. लालती पवनकुमार साहू ही महिला काळाचौकी येथील जिजामाता नगर, परशुरामी नगरात राहते. पवनकुमार हे तिचे पती असून तिला नितीन व विपीन असे दोन मुले आहे. ती मिलन इंडस्ट्रिजमध्ये बॅग बनविण्याच्या कंपनीत कामाला आहे तर तिचे पती पवनकुमारचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. मोठा मुलगा नितीन हा बारावी तर लहान मुलगा विपीन हा अभ्युदयनगरच्य मनपा हिंदी शाळेत शिकतो. मंगळवारी लालती ही नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली होती. सकाळी अकरा वाजता तिचे पती पवनकुमार हे नितीनसोबत त्यांच्या स्कूटीवरुन परळ येथून काळाचौकीच्या दिशेने येत होते. ही स्कूटी ज्योती टॉवरसमोरुन जात असताना एका बसने त्यांच्या स्कूटीला धडक दिली होती. या अपघातात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे पवनकुमार यांना मृत घोषित करण्यात आले. नितीनवर उपचार सुरु होते. मात्र काही वेळानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी लालती साहू हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बसचालक अरविंद हुमणे याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून पिता-पूत्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page