डंपरची स्कूटीला धडक लागून तरुणाचा मृत्यू

डंपरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जून 2025
मुंबई, – डंपरची स्कूटीला धडक लागून झालेल्या अपघातात मोहम्मद जिशान मोहम्मद फकीर अन्सारी या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी डंपरचालक शैलेश सुरेश जैस्वाल याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर आरोपी डंपरचालकाला पोलिसांनी अटक केली होती.

हा अपघात गुरुवारी 5 जूनला सकाळी साडेआठ वाजता काळाचौकी येथील अल्बर्ट जंक्शन येथून रे रोडकडे जाणार्‍या भारत पेट्रोलपंपासमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहम्मद आशिक मोहम्मद बदुउद्दीन हा 22 वर्षांचा तरुण मूळचा बिहारा रहिवाशी असून सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत घोडपदेव परिसरात राहतो. एका गारमेंट दुकानात कपडे विक्रीसह पॅकिंगचे तो काम करतो. त्याचा मोहम्मद जिशान हा मित्र असून ते दोघेही एकाच ठिकाणी कामाला आहेत.

गुरुवारी 5 जूनला सकाळी सात वाजता ते दोघेही त्यांच्या मालकाच्या सांगण्यावरुन गारमेंटचा माल शिवडी येथे घेऊन जात होते. हा माल दिल्यानंतर ते दोघेही त्यांच्या स्कूटीवरुन रे रोडवरुन त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. सकाळी साडेआठ वाजता ही स्कूटी अल्बर्ट जंक्शन येथील भारत पेट्रोलपंपाच्या दिशेने जात होती. यावेळी त्यांच्या मागून भरवेगात जाणार्‍या एका डंपरने त्यांच्या स्कूटीला जोरात धडक दिली होती. त्यात त्यांची स्कूटी स्लीप होऊन ते दोघेही जखमी झाले होते. जखमी दोघांनाही लोकांनी तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मोहम्मद जिशानची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

मात्र उपचारादरम्यान सायंकाळी साडेपाच वाजता त्याचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद आशिकच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालक शैलेश जैस्वाल याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस तर दुसर्‍याला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page