आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्यासाठी कंपन्यांचा पैशांचा अपहार

69 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी असिस्टंट मॅनेजरविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मे 2025
मुंबई, – आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्यासाठी कंपनीच्या सुमारे 69 लाखांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार काळाचौकी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीचा असिस्टंट मॅनेजर एक्सपोर्ट अधिकार्‍याविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन कंपनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विनोद शेषराव राठोड असे या आरोपी अधिकार्‍याचे नाव असून त्याने चार बोगस एजंटच्या बँक खात्यात सुमारे 69 लाखांचे कमिशन पेमेंट ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन कंपनीची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गौरव दगडूलाल सोलंकी हे मूळचे रायगडच्या पनवेल, कोपोर्ली गावाचे रहिवाशी आहेत. गेल्या सहा वर्षांपासून ते काळाचौकी येथील पातोडिया ओव्हरसीज एक्सपोर्ट कंपनीत अकाऊंट असिस्टंट म्हणून कामाला आहेत. कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. तीन वर्षांपूर्वी या कंपनीत विनोद राठोड हा असिस्टंट मॅनेजर एक्सपोर्ट या पदावर कामावर लागला होता. त्याच्याकडे कामाचा चांगला अनुभव असल्याने कंपनीमार्फत विदेशातील खरेदी कंपन्या आणि इतर विक्रेत्या कंपन्यांमध्ये समन्वय ठेवून त्यांच्यात व्यवहार घडवून आणणे आणि कंपनीला कमिशन मिळवून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

याच दरम्यान विनोदने प्रविण सावरकर हा व्हिएतनाम या देशात एका कापड कंपनीत कामाला असून त्याची विदेशातील काही कापड एजन्सी कंपनीसोबत चांगली ओळख आहे. त्याच्याकडून त्यांच्या कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू शकतात. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन दिल्यास आपल्या कंपनीला चांगला फायदा होईल असे सांगितले. काही दिवसांनी त्याने प्रविणकडून त्यांच्या कंपनीला चांगले ऑर्डर मिळाले असून त्याला त्याचे कमिशन आधी पाठवावे लागेल असे सांगितले. त्यामुळे कंपनीच्या बँक खात्यातून त्याच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली होती. अशाच प्रकारे विनोदने प्रविणसह लालसाहेब रामशंकर यादव, धनंजय योगेंद्रप्रताप सिंह आणि रोली लालसाहेब यादव या तीन एजंटच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर केली होती.

1 ऑक्टोंंबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित चारही एजंटच्या बँक खात्यात 69 लाख 83 हजार 513 रुपये पाठविण्यात आले होते. मात्र त्यांनी कंपनीला ठरल्याप्रमाणे ऑर्डर मिळू दिले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर विनोद हा गौरव सोलंकी यांना टाळण्यचा प्रयत्न करत होता. त्याची वागणुक संशयास्पद होती. त्यामुळे कंपनीच्या मालकांनी त्याच्यावर संबंधित ऑर्डर पूर्ण करण्याची सक्त ताकिद दिली होती. मात्र जून 2023 रोजी विनोद राठोड हा नोकरी सोडून निघून गेला होता. त्याने फोन उचलले बंद केले होते, काही दिवसांनी त्याने त्याचा मोबाईल ब्लॉक केला होता. या घटनेनंतर विनोदच्या सर्व व्यवहाराची कंपनीकडून चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यात विनोदने विदेशी कंपन्यांचे सादर केलेले सर्व दस्तावेज बोगस होते. त्याने ज्या एजंटच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले होते, त्या चारही एजंटने ही रक्कम नंतर त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती.

अशा प्रकारे विनोदने कंपनीचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्यासाठी बोगस बिल ऑफ लॅडिंग, शिपमेंट तपशील, पुरवठादरांशी संवाद आदी बोगस बिले बनवून ते कंपनीत सादर करुन कंपनीची आर्थिक फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात कंपनीच्या वतीने गौरव सोलंकी यांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विनोद राठोड याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन 69 लाखांचा अपहार करुन कंपनीी फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विनेाद हा मूळचा जालना येथील मंठा, दाहाचा रहिवाशी असून सध्या तो कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज, म्हाडा कॉलनीत आकुर्ली सुखशांती सोसायटीमध्ये राहत होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो त्याच्या राहत्या घरातून पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page