मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – काळाचौकी येथे राहणार्या एका जीएसटी उपायुक्ताच्या घरी तीस हजाराच्या वॉचची चोरी झाली. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी ४२ वर्षांच्या मोलकरणीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अंजली असे या मोलकरणीचे नाव असून तिने चोरी केली असावी असा संशय तक्रारदारांनी व्यक्त केल्याने तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
डॉ. नवीनकुमार डी ई हे त्यांच्या कुटुंबियांसोबत शिवडीतील झकेरिया बंदर रोड, सेलेस्टिया स्पेसेस इमारतीच्या ४५ व्या मजल्यावर राहतात. त्यांच्यासह त्यांची पत्नी अर्पिता जीएसटी उपायुक्त म्हणून काम करतात. ते नवी मुंबईतील तर त्यांची पत्नी अर्पिता ही नरिमन पॉईट येथील जीएसटी भवनमध्ये कार्यरत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत त्यांनी एका संस्थेच्या मदतीने अंजली नावाच्या एका महिलेस घरकामासाठी ठेवले होते. सकाळी नऊ वाजता कामावर आल्यानंतर अंजली ही सायंकाळी सहा वाजता तिच्या घरी निघून जात होती. त्यासाठी तिला दरमाह २२ हजार रुपये वेतन दिले जात होते. नोव्हेंबर २०२३ रोजी अर्पिताने तिच्यासाठी तीस हजाराचा एक ऍपल आय वॉच घेतला होता. नियमित वॉच वापरल्यानंतर ती बेडरुमच्या टिव्हीच्या टेबलवर वॉच ठेवत होते. ८ ऑगस्टला ते वॉच घरातून चोरीस गेले होते. सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्यांच्या पत्नीला वॉच कुठेच सापडले नाही. त्यामुळे त्यांनी अंजलीकडे विचारणा केली, मात्र तिनेही तिला वॉचबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात पगारावरुन वाद झाला होता.
या वादानंतर अंजलीने कामावर येणार नसल्याचे सांगितले, याबाबत तिच्याकडे विचारणा करुनही तिने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. या घटनेनंतर त्यांना अंजलीनेच ते वॉच चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन तिच्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. लवकरच तिची पोलिसाकडून चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.