५८ वर्षांच्या बेस्टच्या निवृत्त वाहकाची आत्महत्या
फसवणुकीसह अपमानास्पद वागणुकीला कंटाळून आत्महत्या केली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बेस्टमधून निवृत्त घेतलेल्या एका ५८ वर्षांच्या वाहकाने काळाचौकीतील एका हॉटेलमध्ये मोनोफॉस नावाचे विषारी किटकनाशक द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजाराम गजानन गांगण असे या वाहकाचे नाव असून त्यांची फसवणुक करणे तसेच त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात बी. एस सोलंकी, विलास जाधव, अंकुश काळे आणि हेमंत सावंत यांचा समावेश असून या चौघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.
हेरंब राजाराम गांगण हा तरुण घोडपदेव येथे राहत असून तो दादर येथील जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो. राजाराम हे त्याचे वडिल असून ते बेस्टमध्ये वाहक म्हणून नोकरी करत होते. २००७ साली त्यांनी बेस्टमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी स्वतचा बांधकामाचा प्रोजेक्टचा व्यवसाय सुरु केला होता. त्यासाठी त्यांनी एका खाजगी पतपेढीतून कर्ज काढले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणुक केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांचा मित्र बी. एस सोलंकी याने व्यवसायात तीस लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र काम पूर्ण न झाल्याने त्यांना सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे त्यांना इतरांची देणे द्यायचे होते. त्यासाठी त्यांचा कर्जासाठी प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांना सोलंकीसह पतपेढीचा मॅनेजर विलास जाधव सतत शिवीगाळ करुन पैशांची मागणी करत होते. त्यांच्याकडून त्यांचा अपमान केला जात होता.
ऑगस्ट महिन्यात त्यांचा मित्र योगेश गुरव यांनी फायनान्स कंपनीत काम करणार्या हेमंत सावंतची त्यांची ओळख करुन दिली होती. त्याने तो ग्लोबल निर्मल कुबेर फायनान्स कंपनीत कामाला असून त्यांना तीस दिवसांत कर्ज मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी त्यांनी कागदपत्रांसह प्रोसेसिंग फी आणि कमिशन म्हणून त्यांच्याकडून काही रक्कम घेतली होती. काही दिवसांनी त्याने त्यांना कर्ज मंजूर झाल्याचे सांगून त्यांना एक धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. राजाराम यांना त्यांच्या परिचित अकराजणांनी कर्जाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कर्जासाठी २० लाख ८० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती. ते सर्वजण त्यांच्याकडे पैशांसाठी सतत तगादा लावत होते. त्यात अंकुश काळे नावाच्या व्यक्तीकडून त्यांचा प्रचंड मानसिक शोषण सुरु होता.
व्यवसायात झालेले नुकसान, त्यातून कर्जबाजारी झाल्याने अनेकांकडून पैशांसाठी त्यांचा होणार्या अपमानामुळे ते मानसिक तणावात होते. त्यामुळे ते बुधवारी काळाचौकी येथील बॅरिस्टर पै मार्गावरील पल्स हॉटेलमध्ये गेले होते. याच हॉटेलच्या रुममध्ये त्यांनी मोनोफॉस नावाचे विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर हॉटेलच्या कर्मचार्यांना काळाचौकी पोलिसांना देण्यात आला होता. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी त्यांना जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. हॉटेलच्या रुममध्ये पोलिसांना एक सुसायट नोट सापडले असून ते सुसायट नोट राजाराम गांगण यांनी लिहिले होते. त्यात त्यांनी बी. एस सोलंकी, विलास जाधव, अंकुश काळे आणि हेमंत सावंत यांच्यावर गंभीर आरोप करुन त्यांच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते.
या घटनेनंतर हेरब गांगण याच्या तक्रारीवरुन काळाचौकी पोलिसांनी संबंधित चारही आरोपीविरुद्ध फसणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केले आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.