मेल-एक्सप्रेसमध्ये बॅग चोरी करणारा सराईत गुन्हेगार गजाआड

26 लाख 88 हजाराचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 फेब्रुवारी 2026
मुंबई, – मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे बॅगेसह मौल्यवान वस्तू चोरी करणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला कल्याण गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. जाहिर जमाल शेख असे या 28 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा कोलकाताचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी विविध सोन्याचे दागिने, कॅश आणि मोबाईल असा 26 लाख 88 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. चोरीचा हा मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकाला लवकरच परत केला जाणार आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्या अटकेने रेल्वे हद्दीत घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

17 जानेवारी 2026 रोजी यातील तक्रारदार विदर्भ एक्सप्रेसच्या कोच क्रमांक एस-थ्री, सीट क्रमांक 32 वरुन प्रवास करत होते. ही गाडी रात्री पावणेतीन वाजता नाशिक रेल्वे स्टेशनवरुन सुटली होती. याच दरम्यान त्यांची बॅग अज्ञात चोरट्याने पळवून नेली होती. या बॅगेत विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असा 32 लाख 73 हजार 714 रुपयांचा मुद्देमाल होता. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध बॅग चोरीची तक्रार केली होती.

या तक्रारीची पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. विदर्भ एक्सप्रेस ही गाडी ज्या ज्या रेल्वे स्थानकावर थांबली होती, त्या सर्व रेल्वे स्थानकाचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या फुटेजमध्ये दादर रेल्वे स्थानकात एक व्यक्ती गाडीत चढला होता. तक्रारदाराची बॅग घेऊन तो सीएसएमटी रेल्वे स्थानकात तरला होता.

या संशयित आरोपीचे एमओबी रेकॉर्डद्वारे आणि बातमीदाराच्या मदतीने तपासणी केली असता तो रेल्वे हद्दीत गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार जाहिर शेख असल्याचे उघडकीस आले होते. ही माहिती उघड होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपासादरम्यान जाहिर हा कोलकाता येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर गुन्हे शाखेचे एक पथक कोलकाता येथील मालदा परिसरात गेले होते. या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून तांत्रिक माहितीवरुन जाहिर शेखला ताब्यात घेतले.

चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून पोलिसांनी तेरा लाखांची वेगवेगळ्या आकाराची चार सोन्याची लगडी, 4 लाख 92 हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या बांगड्या, 3 लाख 95 हजार रुपयांची एक सोन्याची बांगडी, 2 लाख 30 हजार रुपयांचे ब्रेसलेट, 2 लाखांचे सोन्याची चैनसहीत पेंडल, 56 हजार 500 रुपयांची कॅश आणि तेरा हजाराचा एक मोबाईल असा 26 लाख 88 हजार 14 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला. जाहिर हा कोलकाताच्या दानामोर, बलीया, मालदाहच्या विद्या महेशपूरचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध रेल्वे हद्दीत चोरी केल्याचे अनेक गुन्हे दाखल ाहे. याच गुन्हयांत अटक केल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेश भडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप गायकवाड, गणेश हरिश्चंद्रे, पोलीस हवालदार रविंद्र ठाकूर, प्रमोद दिघे, अक्षय चव्हाण, लक्ष्मण वळकुंडे, हितेश नाईक, महेंद्र कर्डिले, अजय रौधळ, प्रशांत रेडेकर, प्रशांत साळुंके, सुनिल मागाडे, महिला पोलीस हवालदार स्मिता वसावे, रजनीगंधा सानप, पोलीस शिपाई रुपेश निकम, स्वप्नील नांगरे, अक्षय देसाई, तांत्रिक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे, देवीदास अरण्ये, पोलीस अंमलदार विक्रम चावरेकर, पोलीस शिपाई अमोल अहिनवे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page