खंडणीच्या गुन्ह्यांत माजी नगरसेवकाला एक दिवसांची कोठडी
कारवाईनंतर छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑगस्ट 2025
मुंबई, – खंडणीच्या गुन्ह्यांत कारवाई होताच छातीत दुखू लागल्याने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा माजी नगरसेवक कमलेश केदारनाथ राय याला अखेर सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपणार असल्याने त्याला पुन्हा उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे.
अंधेरीतील रहिवाशी असलेले पप्पूभाई ऊर्फ अब्दुल सत्तार शेख हे खाजगी कॉन्ट्रक्टर आहेत. त्यांच्या कंपनीचे अंधेरी परिसरात एक प्रोजेक्ट सुरु आहे. या ठिकाणी सुरु असलेले बांधकाम अवैध आणि अनधिकृत असल्याचा आरोप करुन ते बांधकाम थांबविण्याची धमकीच माजी नगरसेवक कमलेश राय याने दिली होती. ते बांधकाम सुरळीत सुरु ठेवण्यासाठी त्याने तक्रारदार अब्दुल शेख यांच्याकडे 35 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणीची ही रक्कम दिली नाही बांधकामावर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी कमलेश रायला काही रक्कम खंडणी म्हणून दिली होती.
तरीही त्यांच्याकडे कमलेशने आणखीन पाच लाखांची मागणी सुरु केली होती. ठरल्याप्रमाणे अब्दुल शेख यांनी पाच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवून कमलेश राय याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांच्या सूचनेनुसार त्यांनी कमलेश रायला अंधेरीतील मरोळ, मिलिटरी रोडच्या प्राईम अॅकडमी स्कूलजवळील हॉटेल गोल्डन टुलीप्समध्ये बोलाविले होते. यावेळी खंडणीची रक्कम घेताना कमलेशला पोलिसांनी पाच लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले होते.
याच गुन्ह्यांत कारवाई केल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे त्याच्या छातीत अचानक दुखू लागले होते. त्यामुळे तपासणीनंतर त्याला डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले होते. सोमवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याला खंडणीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.