शूटींगवरुन घरी जाताना उर्मिला कानेटकरच्या कारने दोघांना उडविले
एका मजुराचा जागीच मृत्यू तर उर्मिलासह तिघांवर उपचार सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ डिसेंबर २०२४
मुंबई, – रात्री उशिरा शूटींगवरुन परतत असताना सिनेअभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारी हिच्या कारचालकाचा कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने मेट्रोचे काम करणार्या दोन कामगारांना जोरात धडक दिली. या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दुसरा कामगार जखमी झाला. अपघातात उर्मिला कानेटकर हिच्यासह तिचा कारचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी तिघांवर कांदिवली आणि मालाडच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये संब्रातदार जितेंद्र दास तर जखमी कामगाराचे नाव सुजन दास असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी आरोपी कारचालक गजानन मुन्नी पाल याच्याविरुद्ध समतानगर पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका कामगाराच्या मृत्यूसह स्वतसह तिघांना दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात शनिवारी रात्री उशिरा मध्यरात्री कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील पोयसर मेट्रो स्थानकाजवळ झाला. उर्मिला कानेटकर ही सिनेअभिनेत्री असून ती रात्री उशिरा शूटींगवरुन घरी जाण्यासाठी निघाली होती. तिची कार पोयसर मेट्रो स्टेशनजवळ येताच कारचा चालक गजानन पाल याचा कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने मेट्रोचे काम करणार्या दोन कामगारांना जोरात धडक दिली होती. या अपघातात उर्मिलासह तिचा कारचालकही जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दोन्ही कामगारांना मालाड येथील कुरार व्हिलेजमधील माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे संब्रातदार दास याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. दुसरा कामगार सुजन दासवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
अपघातात उर्मिलासह तिचा कारचालक गजानन हेदेखील जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना कांदिवलीतील नमाह रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी रात्री उशिरा कारचालक गजानन पाल याच्याविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. रुग्णालयात उपचार सुरु असल्याने त्याच्यावर अद्याप अटकेची कारवाई झाली नाही. डिस्चार्ज मिळताच गजानला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.