भरवेगात जाणार्या टेम्पोची दोन वयोवृद्ध महिलांना धडक
71 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू तर दुसरी महिला जखमी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2025
मुंबई, – रस्ता क्रॉस करताना भरवेगात जाणार्या एका टेम्पोने दोन वयोवृद्ध महिलांना धडक दिली. या अपघातात भारती सुभाष शहा या 71 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर हंसा प्रविणकुमार धिवाला ही 72 वर्षांची महिला गंभीररीत्या जखमी झाली होती. तिच्यावर तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी टेम्पोचालक इक्बाल वजीर शेख याला अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हा अपघात शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता कांदिवलीतील एस. व्ही रोड, सेंट्रल बॅक ऑफ इंडियासमोर झाला. हंसा प्रविणकुमार धिवाला ही 71 वर्षांची वयोवृद्ध महिला कांदिवलीतील डहाणूकरवाडी, लालजी कॉम्प्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहते. शनिवारी सायंकाळी सहा वाजता ती घरगुती सामान खरेदीसाठी आली होती. कांदिवलीतील सेंट्रल बँक ऑफ इंडियासमोर वाहतूकीची जास्त वर्दळ असल्याने ती सिग्नलची वाट पाहत होती. काही वेळानंतर ती आणि तिच्यासोबत अन्य एक वयोवृद्ध रस्ता क्रॉस करत होती. याच दरम्यान मालाड येथून बोरिवलीच्या दिशेने जाणार्या एका टेम्पोने या दोन्ही महिलांना जोरात धडक दिली होती.
या अपघातात त्या दोघीही गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी दोन्ही वयोवृद्ध महिलांना मालाड येथील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच हंसा धिवाला यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. यावेळी तिला तिच्यासोबत रस्ता क्रॉस करणार्या भारती शहा या महिलेचा मृत्यू झाल्याचे समजले होते. भारती ही कांदिवलीतील एस. व्ही रोड, श्रीराम अपार्टमेंटमध्ये राहत असून ती कामानिमित्त बाहेर जात होती. यावेळी हा अपघात झाला.
अपघातानंतर हंसा धिवाला हिची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात आली होती. या जबानीनंतर पोलिसांनी आरोपी टेम्पोचालक इक्बाल शेख याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस तर दुसर्या वयोवृद्ध महिलेला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच इक्बाल शेख याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.