रेकी करुन दुकानातील कॅश पळविणारा सराईत गुन्हेगार गजाआड
आरोपीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात शंभरहून अधिक गुन्हे दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 नोव्हेंबर 2025
मुंबई, – रेकी करुन रात्रीच्या वेळेस दुकानातील कॅश पळविणार्या एका सराईत गुन्हेगाराला कांदिवली पोलिसांनी अटक केली. अझान खान ऊर्फ अभयराज मोतीलाल सरोज ऊर्फ मोनू असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात चोरीसह घरफोडीच्या शंभरहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. अझान हा सोन्याचे दागिन्यासह इतर कुठलाही मुद्देमाल चोरी करत नसून फक्त कॅशची चोरी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी कांदिवलीतील एका दुकानात रात्रीच्या वेळेस चोरी झाली होती. या दुकानातील कॅश घेऊन अज्ञात चोरट्याने पलायन केले होते. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच दुकानाच्या मालकाने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अझान खान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीत तो चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले होते. त्यानेच तक्रारदाराच्या दुकानात प्रवेश करुन आतील कॅश चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीनंतर तो पळून गेला होता. तो मालाडच्या मालवणी, मार्वे येथील स्मशानभूमीजवळील सिग्नलवरुन वेगवेगळ्या ठिकाणी जात होती. रात्री दोन ते पहाटे चार या वेळेस तो रेकी करुन तो घरासह दुकानात चोरी करत होता. मात्र चोरी करताना तो घरासह दुकानातील सोन्याचे दागिने, मोबाईलसह इतर कुठलाही मुद्देमालाची चोरी करत नव्हता. फक्त कॅश चोरी करुन तो पळून जात होता. त्याच्याविरुद्ध शंभरहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून आहे.
यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा चोरी करत होता. चोरी केल्यानंतर तो ड्रग्ज विकत घेत होता. दोन ते तीन दिवस ड्रग्जच्या आहारी राहिल्यानंतर तो पुन्हा चोरीसाठी निघत होता. मालवणी परिसरात एका दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने आल्यानंतर त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली होती.