पगारावरुन झालेल्या वादातून सुरक्षारक्षकावर कोयत्याने हल्ला
हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांत सुरक्षारक्षकाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जुलै 2025
मुंबई, – पगारावरुन झालेल्या वादातून दिपक कल्पनाथ दुबे या 41 वर्षांच्या सुरक्षारक्षकावर त्याच्या माजी सहकार्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी सुरक्षारक्षक ललित प्रेमसागर तिवारी (26) याला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना रविवारी 13 जुलैला सकाळी सव्वासहा वाजता कांदिवलीतील मथुरादास रोड, केईएस लॉ कॉलेजवळील भरत बिल्ला इमारतीमध्य घडली. दिपक दुबे हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी सध्या तो बोरिवलीतील जांभळी नाका, भट चाळीत राहतो. गेल्या पाच महिन्यांपासून तो प्रकाश सिक्युरिटी सर्व्हिस या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सध्या त्याची नेमणूक भरत बिल्ला इमारतीमध्ये होती. याच ठिकाणी पूर्वी ललित तिवारी हा सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. ललित हादेखील उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो त्याच्यासोबत काम करत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या चांगले परिचित होते. ललित कामात हलगर्जीपणा करत होता. व्यवस्थित काम करत नसल्याने त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी कंपनीला प्राप्त झाले होते. त्यामुळे त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्याचा पगार देण्यात आला नव्हता.
याच पगारावरुन तो भरत बिल्ला इमारतीमध्ये येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होता. रविवारी सकाळी सव्वासहा वाजता तो तिथे आला होता. यावेळी त्याने त्याचा पगार देण्यावरुन दिपकशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. हा वाद सुरु असताना त्याने त्याच्याकडील बॅगेतून कोयता काढला आणि त्याने दिपकवर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या डोक्याला, पायाला, पोटाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. ही माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
हल्ल्यात दिपक हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी ललित तिवारीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर सोमवारी दुपारी त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यांतील कोयता जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.