जोगेश्वरीनंतर कांदिवलीतील शाळेत बॉम्बच्या मेलने तणाव
आयपी ऍड्रेसच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – जोगेश्वरतील एका नामांकित शाळेत बॉम्ब असल्याची धमकीची घटना ताजी असताना सोमवारी सकाळी कांदिवली इज्युकेशन सोसायटी या शाळेत बॉम्ब असल्याचा ई-मेल आल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेची संपूर्ण इमारत खाली करुन तपासणी केल्यानंतर तिथे काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्ब असल्याची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे शाळेतील शिक्षकासह पालक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत कांदिवली पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. याप्रकरणी मेलवरुन बॉम्ब असल्याची धमकी देणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून आयपी ऍड्रेसच्या माध्यमातून त्याचा शोध सुरु केला आहे.
गेल्याच आठवड्यात जोगेश्वरीतील एका नामांकित शाळेत बॉम्ब असल्याचा मेल आला होता, संपूर्ण शाळेची तपासणी केल्यानतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाहीतर तोवर सोमवारी सकाळी कांदिवली येथील कांदिवली इज्युकेशन सोसायटीच्या शाळेत सकाळी अशाच प्रकारे एका अज्ञात व्यक्तीने मेल पाठविला होता. त्यात त्याने शाळेत बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शाळेची संपूर्ण इमारत खाली करण्यात आली होती. ही माहिती नंतर मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला देण्यात आली. या माहितीनंतर कांदिवली पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती.
संपूर्ण शाळेची इमारत खाली केल्यानंतर शाळेची तपासणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांना कुठेही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. एका आठवड्यात दोन शाळांना एकाच प्रकारे मेल पाठवून बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आलली होती. त्यामुळे या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिेले आहे. जोगेश्वरी व कांदिवली येथील शाळेत आलेल्या मेलची चौकशी सुरु आहे. हा मेल कोणी पाठविला, त्याचा आयपी ऍड्रेस कोणाचा आहे याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.