मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ डिसेंबर २०२४
मुंबई, – स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडल्याने सोमवारी कांदिवलीतील चारकोप परिसरात एकच खळबळ उडाली होती. अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कांदिवलीतील चारकोप, म्हाडा, अष्टविनायक सोसायटीजवळील एका कचराकुंडीत एक नवजात अर्भक बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती एका दक्ष नागरिकाने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला दिली होती. ही माहिती कंट्रोल रुममधून प्राप्त होताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. या अर्भकाला तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे या अर्भकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ते अर्भक शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. मुलीचा जन्म लपविण्याच्या उद्देशाने अर्भकाची अज्ञात व्यक्तीने विल्हेवाट लावून पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सोमवारी दुपारी मृत अर्भक सापडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.