फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड व्यावसायिकाला अटक

मक्याच्या दाण्यासाठी घेतलेल्या पेमेंटचा अपहार केला होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जून 2025
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड व्यावसायिकाला गुरुवारी कांदिवली पोलिसांनी अटक केली. जितेंद्र राजाराम कांबळे असे या 42 वर्षीय व्यावसायिकाचे नाव असून फसवुणकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत मलई बाबू, गौतमकमार आणि धीरज पांडे असे तीनजण सहआरोपी असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या चौकडीवर एका व्यावसायिकाची 51 लाख 50 लाखांच्या पेमेंटचा अपहार केल्याचा आरोप आहे.

हार्दिक भद्रेशकुमार शहा हे व्यावसायिक असून कांदिवली परिसरात राहतात. त्यांची एक खाजगी कंपनी असून ही कंपनी वेगवेगळ्या कंपन्यांना माल पुरविण्याचे काम करते. जुलै 2024 रोजी त्यांच्या कंपनीला एका खाजगी कंपनीकडून पाच कोटीच्या दोन हजार मेट्रीक ट्रन मक्याचे दाणे पुरविण्याचे ऑर्डर मिळाली होती. त्याच्या पूर्ततेसाठी त्यांच्यासह त्यांचा पार्टनर श्रेयांश चौप्रा हे प्रयत्नशील होते. याच दरम्यान त्यांची ग्लोबल इम्पेक्स कंपनीचे संचालक जितेंद्र कांबळेशी ओळख झाली होती. त्याने त्यांना दोन हजार मेट्रीक टन मक्याचे दाणे पुरविण्याचे आश्वासन दिले होते.

त्यासाठी त्यांनी त्याला ऑगस्ट 2024 रोजी पार्ट पेमेंट म्हणून वीस लाख रुपये आरटीजीएस केले होते. त्यानंतर जितेंद्रने त्यांना चेन्नई येथून शंभर टन माल चार ट्रकमधून पाठवून दिला होता. यावेळी त्यांनी त्याला आणखीन काही माल पाठविण्याची विनंती करताना त्याला शंभर टन मालासाठी 29 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र दिलेल्या मदतीत त्याने मक्याचे दाण्याचा माल पाठविला नाही. अशाच प्रकारे त्यांनी एजंट मलई बाबू, गौतम ट्रेडर्स आणि द कन्सलटंटचे मालक धीरज पांडे यांनी मक्याचे दाणे पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी त्यांना अनुकमे सतरा आणि साडेचौदा लाखांचे पेमेंट केले होते. मात्र त्यांनीही त्यांना मक्याच्या दाण्याच्या मालाची डिलीव्हरी न करता त्यांनी दिलेल्या पेमेंटचा अपहार केला होता.

पेमेंट मिळताच त्यांनी त्यांचे मोबाईल स्विच ऑफ केले होते. त्यामुळे वारंवार संपर्क साधून त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. अशा प्रकारे 2 ऑगस्ट 2024 ते 25 फेब्रवारी 2025 या कालावधीत जितेंद्र कांबळे, मलई बाबू, गौतमकुमार आणि धीरज पांडे यांनी मक्याचे दाणे पुरविण्याचे आश्वासन देऊन त्यांनी दिलेल्या 51 लाख 50 हजार रुपयांचा अपहार करुन हार्दिक शहा व त्यांच्या कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी संबंधित चारही आरोपीविरुद्ध कांदिवली पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जितेंद्र कांबळे, मलई बाबू, गौतमकुमार आणि धीरज पांडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या जितेंद्र कांबळे याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. चौकशीत त्याने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील इतर तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. त्यासाठी कांदिवली पोलिसांची एक टिम लवकरच बिहारला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page