मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 नोव्हेंबर 2025
मुंबई, – सोशल मिडीयावर कार विक्रीची जाहिरात करुन फसवणुक करणार्या एका वॉण्टेड आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. टिगन अनिल अल्वारेस असे या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. याच गुन्ह्यांत तो गेल्या चार महिन्यांपासून वॉण्टेड होता, अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.
49 वर्षांचा तक्रारदार रियल इस्टेट व्यावसायिक असून तो कांदिवली परिसरात राहतो. जून महिन्यांत त्याला एका मारुती सुझुकी कार विक्रीची जाहिरात दिसली होती. त्यामुळे त्याने जाहिरातीमध्ये दिलेल्या टिगन याच्या मोबाईलवर संपर्क साधला होता. त्याच्याशी कारशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्याने कार खरेदीचा निर्णय घेतला होता. कारसाठी त्याने टिगनला सुमारे आठ लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने कारची डिलीव्हरी केली नाही.
कार न देता तो पळून गेल्याची खात्री होताच त्याने कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून टिगनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर टिगन अल्वारेस याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांत चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या टिंगनला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली.
तपासात तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.