मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – सुमारे २४ लाखांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सचिन तेंडुलकर जिमखान्यातील रेस्ट्रॉंरटचा मॅनेजर तेजराज अशोक पेडणेकर याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिलाची रक्कम जिमखान्याच्या बँक खात्यात जमा न करता या पैशांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केल्याचा तेजराज पेडणेकर याच्यावर आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्याला चौकशीसाठी समन्स बजाविले जाणार आहे. चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.
जितेंद्र सत्यदेव वर्मा हे विरार येथील नालासोपारा लिंग रोड, म्हाडा कॉलनीत राहतात. कांदिवलीतील मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखान्यात ते सिनिअर अकाऊंट ऍण्ड फायानान्स मॅनेजर म्हणून कामाला आहेत. याच जिमखान्यातील रेस्ट्रॉरंटमध्ये तेजराज पेडणेकर हा कॅशिअर म्हणून कामाला आहेत. रेस्ट्रॉरंटमधील सर्व आर्थिक व्यवहाराची त्याच्यावर जबाबदार होती. ४ मे ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत रेस्ट्रॉरंटमधील काही बिलांची रक्कम त्याने भारत पे आणि व्हिझा मास्टरचे कार्डने प्राप्त केले होते. सुमारे २४ लाखांची रक्कम त्याने जिमखान्याच्या बँक खात्यात जमा न करता परस्पर पैशांचा अपहार केला होता.
ऑडिटदरम्यान हा प्रकार अलीकडेच जितेंद्र वर्मा यांच्या लक्षात आला होता. त्यामुळे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. या चौकशीदरम्यान तेजराज पेडणेकर याने जिमखान्यातील २४ लाख १० हजार ८१७ रुपयांच्या बिलाच्या रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. याबाबत त्याला नोटीस देऊन खुलासा करण्यास सांगण्यात आले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जितेंद्र वर्मा यांनी जिमखान्याच्या वतीने कांदिवली पोलिसांत तक्रार केलनी होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तेजराज पेडणेकर याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तेजराज हा कांदिवलीतील चारकोप, सेक्टर दोनच्या चारकोप कावेरी सोसायटीमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रेस्ट्रॉरंटच्या मॅनेजरने आर्थिक घोटाळा केल्याचे उघडकीस येताच तिथे काम करणार्या अधिकारी अणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.