खातेदारांकडून घेतलेल्या 18 लाखांचा अपहार करुन फसवणुक
खाजगी पतपेढीच्या दोन कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मार्च 2025
मुंबई, – खातेदारांकडून घेतलेल्या सुमारे 18 लाखांचा अपहार करुन एका खाजगी पतपेढीची त्यांच्याच दोन कर्मचार्यांनी फसवणुक केल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रशांत गायकवाड आणि प्रविण चौरसिया या दोन्ही कर्मचार्याविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत हा संपूर्ण आर्थिक घोटाळा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
विजयकुमार कपिलदेव हे 63 वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील संत ज्ञानेश्वर नगरात राहतात. याच परिसरातील इराणीवाडीत श्री सिद्धीविनायक सहकारी क्रेडिट सोसायटी नावाची एक पतपेढी असून तिथे ते अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांच्याकडे प्रशांत गायकवाड क्लार्क तर प्रविण चौरसिया हा कलेक्शन एजंट म्हणून कामाला आहे. त्यांच्या पतपेढीत अनेक खातेदार असून त्यापैकी काही खातेदारांनी कर्ज घेतले आहे. तसेच काही खातेदार नियमित पतपेढीत ठराविक रक्कम जमा करतात. अशा खातेदारांकडून पैसे जमा करुन ती रक्कम पतपेढीत जमा करण्याची तसेच जमा केलेल्या पैशांची नोंद करुन त्यांचे पासबुक खातेदारांना परत देण्याची जबाबदारी प्रविण चौरसिया याच्यावर होती.
1 जानेवारी 2022 ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत त्याने 110 खातेदारांकडून 18 लाख 71 हजार 577 रुपये घेतले होते. ही रक्कम पतपेढीत जमा न करता त्याने संगणकीय लेझर बुकमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केले होते. याकामी त्याला पतपेढीचा क्लार्क प्रशांत गायकवाड याने मदत केली होती. या दोघांनी संगनमत करुन खातेदारांच्या पैशांचा अपहार करुन ही फसवणुक केली होती. हा प्रकार अलीकडेच विजयकुमार यांच्या निदर्शनास आला होता. त्याची संचालक मंडळांनी गंभीर दखल घेत त्याची चौकशी सुरु केली होती. चौकशीदरम्यान 110 खातेदारांनी गेल्या दोन वर्षांत प्रशांत चौरसिया आणि प्रशांत गायकवाड 18 लाख 71 हजार 577 रुपये दिले होते. मात्र ही रक्कम त्यांनी पतपेढीत जमा न करता या पैशांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विजयकुमार यांनी पतपेढीच्या वतीने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रविण चौरसिया आणि प्रशांत गायकवाड याच्याविरुद्ध पोलिसांनी पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.प्रशांत हा मालाड तर प्रविण कांदिवलीतील आकुर्ली रोड, क्रांतीनगरात राहत असून त्यांना लवकरच चौकशीसाठी समन्स पाठविले जाणार आहे.