शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने पंधराजणांची अठरा लाखांची फसवणुक
खाजगी कंपनीच्या संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 जानेवारी 2026
मुंबई, – शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने एका वयोवृद्धासह त्यांच्या परिचित पंधराजणांची सुमारे अठरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या संचालक असलेल्या मेहुल अजीतकुमार गोसालिया याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिमांशू नागीनदास मेहता हे 63 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार घाटकोपर परिसरात राहतात. एका खाजगी फार्मासिटीकल कंपनीत ते मेडीकल सेल्समन म्हणून कामाला आहे. परेश चंदूलाल शाह हा त्यांचा मित्र असून त्याने त्यांना मेहुल गोसालिया याच्याविषयी माहती दिली होती. मेहुल हा बोरिवलीतील शिंपोली रोड, सोनीवाडी, ब्रदीनाथ अपार्टमेंटमध्ये राहत असून त्याची कांदिवली परिसरात एक खाजगी कंपनी आहे. त्याच्याकडे टपारिया टुल्स लिमिटेड या नामांकित कंपनीचे शेअर असून या शेअरची तो विक्री करत होता. त्याच्याकडे शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास भविष्यात त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले. त्यानेही त्याच्या कंपनीमार्फत शेअरमध्ये गुंतवणुक केली असून त्यात चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता.
त्याच्यावर विश्वास भेटून हिमांशू मेहता यांनी मेहुलची भेट घेतली होती. या भेटीत त्याने त्याच्याकडे टपारिया टुल्स लिमिटेड कंपनीचे अठरा लाख शेअर आहेत. या शेअरची तो त्यांच्या विश्वासू आणि परिचित व्यक्तींना विक्री करतो, जेणेकरुन त्यांना शेअरच्या माध्यमातून चांगला फायदा होईल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या परिचित प्रकाश पटेल, अभश शहा, चंद्रीका कोठारी, जिग्नेश काबानी, धर्मेश व्यास, भावेश मेहता, दिपेश शहा, राजवी दोशी, अमी शाह, विमल शहा, मिता शाह, भारत राजा, उषा पांडे आणि रिता मेहता यांनाही शेअर गुंतवणुकीची माहिती देऊन त्यांना मेहुल गोसासिया याच्याकडे गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. हिमांशू मेहता यांच्यावर विश्वास असल्याने त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला हाता. मे ते जून महिन्यांत हिमांशू मेहता यांच्यासह इतर चौदाजणांनी मेहुलला 18 लाख 34 हजार 100 रुपये ट्रान्स्फर केले होते.
ही रक्कम मेहुलच्या बँक खात्यात पाठविण्यात आली होती. या पेमेंटनंतर मेहुलकडून त्यांना पैसे मिळाल्याची पावती देण्तया आली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना शेअर दिले नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळण्यचा प्रयत्न करत होता. लवकरच त्यांना त्यांचे शेअर पाठविले जातील असे सांगत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी बोरिवीतील स्टॉक होल्डींग कार्पोरेशनमध्ये मेहुलने दिलेल्या एनएसडीएलचे प्रमाणपत्राबाबत चौकशी केली होती. यावेळी मेहुलकडे टपारिया टुल्स लिमिटेड कंपनीचे कुठलेही शेअर नसल्याचे समजले होते.
त्याने त्याच्याकडे अठरा लाख कंपनीचे शेअर असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडून शेअर गुंतवणुकीसाठी घेतलेल्या 18 लाख 34 हजाराचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मेहुलविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मेहुल गोसालिया याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांची त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.