शाळेच्या नवीन इमातीच्या बांधकामाच्या 42 लाखांचा अपहार
बिल्डर पती-पत्नीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑगस्ट 2025
मुंबई, – शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी दिलेल्या सुमारे 42 लाखांच्या अपहार करुन एका शिक्षकाची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिल्डर पती-पत्नीविरुद्ध चारकोप पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मधुकर कृष्णा साळुंखे आणि मानसी मधुकर साळुंखे अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
ईश्वर युवराज खैरनार हे कांदिवलीतील चारकोपचे रहिवाशी आहे. सध्या ते चारकोप परिसरातील प्रियदर्शनी विद्या मंदिर या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात. ते मूळचे धुळ्याचे रहिवाशी असून जुनवणे येथे त्यांची पार्वताई इंग्लिश मिडीयम स्कूल नावाची एक शाळा आहे. या शाळेच्या संस्थेमध्ये त्यांचे वडिल उपाध्यक्ष तर ते सहसचिव म्हणून काम पाहत होते. सध्या ते संस्थेचे अध्यक्ष आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या शाळेच्या इमारतीचे नव्याने बांधकाम करायचे होते. याच दरम्यान त्यांची बोरिवलीतील रहिवाशी असलेले मधुकर साळुंखे यांच्याशी ओळख झाली होती. ते व्यवसायाने बिल्डर असल्याने त्यांनी त्यांच्याशी शाळेच्या नवीन इमारतीच्याा बांधकामविषयी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेनंतर मधुकरने त्यांच्या शाळेच्या इमारतीला भेट दिली आणि नवीन इमारतीच्या बांधकामासाठी किमान पाच कोटी खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी मधुकर सोळंखेने त्याच्या परिचित काही लोक आर्थिक मदत करतील, मात्र शाळेच्या संस्थेवर त्यांची पदाधिकारी म्हणून नेमणूक करावी अशी अट घातली होती. त्यामुळे ईश्वर खैरनार यांनी त्यांची संस्थेच्या अध्यक्ष, त्यांची पत्नी मानसीची सेके्रटरी, त्यांचे नातेवाईक ममता मंगेश देसाई, शिवाजी भाऊराव अवसरमोल यांची संस्थेच्या सदस्य म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर संस्थेचा नवीन कार्यकारणीचा प्रस्ताव धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आले. इमारतीचे बांधकाम सुरु करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे 50 लाखांची मागणी केली. ही रक्कम त्यांना परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यासह त्यांची मुलगी करिश्मा खैरनार यांनी बँकेतून कर्ज काढून ऑगस्ट 2022 रोजी सुमारे 42 लाख रुपये दिले होते.
मात्र ही रक्कम देऊनही मधुकरने शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरु केले नाही. विचारणा केल्यानंतर ते विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. अनेकदा ते विचारणा केल्यानंतर धमकी देत होता. याच दरम्यान मधुकर साळुंखेसह इतर सर्वांनी संस्थेचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याने त्यांचा मोबाईल ब्लॉक केला होता. या घटनेनंतर त्यांनी त्यांच्याकडे शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी दिलेल्या 42 लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र तीन वर्ष उलटूनही मधुकर व त्याची पत्नी मानसीने त्यांना पैसे परत केले नाही.
या दोघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मधुकर साळुंखे व मानसी साळुंखे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.