ग्राहकांना बोगस तिकिट देऊन ट्रॅव्हेल्स कंपनीची आर्थिक फसवणुक
कांदिवलीतील घटना; कंपनीच्या सेल सल्लागाराला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ एप्रिल २०२४
मुंबई, – विदेशात सहलीसाठी जाणार्या ग्राहकांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने बुकींगबाबत खोटी माहिती देऊन बोगस तिकिट बनवून सुमारे पावणेतेरा लाखांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी कौशल राजेश शहा या आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. कौशल हा कंपनीचा सेल सल्लागार असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
पारस संजय शहा हा दहिसर येथे राहत त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. राजूल शहा यांच्या मालकीच्या फ्लेमिंगो ट्रान्सवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तो गेल्या बारा वर्षांपासून ब्रॅच मॅनेजर म्हणून काम करतो. या कंपनीचे कांदिवली येथे एक शाखा असून तिथे सर्व प्रकारच्या बुकींग, प्रवास आणि लॉजिंगसंदर्भातील सेवा पुरविले जातात. भारतासह भारताबाहेर जाणार्या ग्राहकांकडून ठराविक रक्कमेचे चार्जेस देऊन त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. गेल्या वर्षी कंपनीने कौशल शहा याची सेल सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. कंपनीच्या ग्राहकांना भारतात तसेच भारताबाहेर जाण्यासाठी त्यांच्या गरजेप्रमाणे विविध पॅकेज ऍरेज करुन त्याची डिटेल माहिती जमा करुन ती कंपनीत देणे, कंपनीच्या बँक खात्यात ग्राहकांचे विमान तिकिटासह लॉजिंगची व्यवस्था करणे, ग्राहकांकडून आलेले पेमेंट कंपनीच्या बँक खात्यात जमा करणे आदी सर्व कामाची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. जानेवारी २०२४ रोजी दर्शन शहाने त्यांच्या कुटुंबियांसोबत थायलंडसाठी बुकींग केले होते. त्यासाठी त्याने दोन लाख पाच हजार रुपयांचे पेमेंट केले होते. ही रक्कम कौशलने स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. हा प्रकार नंतर पारस शहा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली होती. यावेळी कौशलने नजरचुकीने संबंधित पेमेंट झाल्याचे सांगितले होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याची कंपनीकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी कौशलने सहा ते सात ग्राहकांकडून पेमेंट घेतले होते. मात्र ते पेमेंट कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या कार्यालयात सागर कोठारी, विपुल ठक्कर, कुणाल कोठारी आले होते. त्यांनी त्यांच्या सतरा कुटुंबियांसोबत सिंगापूर, मलेशिया देशाचे आठ दिवस आणि नऊ रात्रीचे विमान तिकिटासह लॉजिंगसाठी पावणेसात लाख रुपये दिल्याचे सांगितले होते. मात्र ते पेमेंटही त्याने आयर्लंड टुर्सच्या नावाने असलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. चौकशीदरम्यान कौशलने ही कंपनी त्याची सिस्टर कंपनी असल्याचे ग्राहकांना सांगितले होते. काही ग्राहाकांना त्याने बोगस तिकिट देऊन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच कंपनीने कौशलला कामावरुन काढून टाकले होते. अशा प्रकारे कौशलने ग्राहकांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने बुकींबाबत खोटी माहिती देऊन बोगस तिकिट देऊन ग्राहकाकडून घेतलेल्या सुमारे पावणेतेरा लाखांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने पारस शहाने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कौशल शहाविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज पैशांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच कौशलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच कंपनीची आर्थिक फसवणुक केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.