मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मारामारीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या आरोपींमध्ये सुभाष विश्वकर्मा आणि करण पांडे यांचा समावेश आहे. यातील सुभाषला एक हजाराचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना कारावास तर करणला सहा महिने सश्रम कारावास आणि पाच हजाराचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
यातील तक्रारदार सचिन सिंग हे कांदिवली परिसरात राहतात. याच परिसरात सुभाष आणि करण हे दोघेही राहत असून सचिन यांच्या परिचित आहेत. त्यांच्यात सीसीटिव्ही कॅमेरा लावण्यावरुन वाद झाला होता. याच वादातून २ एप्रिल २०१७ रोजी सचिन यांच्यावर सुभाष आणि करण यांनी प्राणघातक हल्ला केला होता. बॅटने केलेल्या मारहाणीत सचिनच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध नंतर बोरिवलीतील लोकल कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. एम मुजावर यांनी दोन्ही आरोपी सुभाषण आणि करण यांना दोषी ठरविले होते. त्यापैकी सुभाषला एक हजाराचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना कारावास तर करणला सहा महिने सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता हेमंत पगारे यांनी युक्तिवाद केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे, पोलीस निरीक्षक हरिश गवळी, तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक भारती हावळे व न्यायालयीन कामकाज पाहणारे सहाय्यक फौजदार उल्हास राठोड, पोलीस अंमलदार राजेंद्र नवाळे, श्रीशैल कुर्हाडे यांनी आरोपीविरुद्ध नमूद खटला चालू असताना गुन्ह्यांतील फिर्यादी, पंच, साक्षीदारांना सुनावणीच्या वेळेस न चुकता हजर केले. तसेच न्यायालयीन कामकाजात मदत केली होती. कांदिवली पोलिसांनी लोकल कोर्टात सादर केलेल्या साक्षी पुराव्यांमुळे या दोन्ही आरोपींना शिक्षा होऊन जनमाणसात पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणार्या गुन्हेगारांना जरब बसली आहे.