घातक शस्त्रांच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ डिसेंबर २०२४
मुंबई, – घातक शस्त्रांच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. निखिल रामकुंवर मीना आणि अबूतलीब आदम शफीउल्लाह अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची मुंबईत विक्री करणारे काही आरोपी सक्रिय होते, अशा शस्त्रे विक्रेत्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना उत्तरप्रदेशातून काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी दहिसर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शना पोलीस हवालदार महेश रावराणे, जयेश केणी, खांडेकर यांनी दहिसर येथील लिंक रोड, गणपत पाटील नगर, लॅण्डमार्क व्हेज डायट रेस्ट्रॉरंटसमोर साध्या वेशात पाळत ठेवून निखील मीना या २६ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतुसे जप्त केले. निखील हा राजस्थानच्या कोटपुतली, पावटाचा रहिवाशी आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याला उत्तरप्रदेशातील मिरा नावाच्या एका महिलेने ते शस्त्रे मुंबईत विक्रीसाठी दिले होते. या शस्त्रांच्या विक्रीतून त्याला ३५ हजार रुपये मिळणार होते. त्यामुळे तो शस्त्रांची विक्रीसाठी मुंबईत आला होता. मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.

अशाच दुसर्‍या कारवाईत युनिटच्या अकराच्या पथकाने अबूतलीब शफीउल्लाह या ३३ वर्षांच्या आरोपीस अटक केली. तो नालासोपारा येथील बैतुलनासर, सोपारा पार्क अपार्टमेंटमध्ये राहतो. बुधवारी सायंकाळी तो कांदिवलीतील शिवाजी रोड, डहाणूकर सहकारी सोसायटीसमोर घातक शस्त्रांची विक्रीसाठी आला होता. ही माहिती प्राप्त होताच वरिष्ठांच्या आदेशावरुन पोलीस हवालदार सावंत, जयेश केणी, खांडेकर, रावराणे, पोलीस शिपाई दर्शन विचारे यांनी अबूतलीब याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. तपासात तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दोन गुन्ह्यांची नोंद आहे. शस्त्रांची विक्रीप्रकरणी त्याला यापूर्वीही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोन्ही आरोपींना गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page