सोने बनविणार्‍या कारखान्यातून 27 लाखांच्या सोन्याची चोरी

चोरीच्या दोन गुन्ह्यांत कारागिरासह चौघांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जून 2025
मुंबई, – कांदिवली आणि दहिसर परिसरातील सोने बनविण्याच्या कारखान्यात झालेल्या 27 लाख 65 हजार रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी कारखान्यातील दोन कारागिरासह चौघांना कांदिवली आणि दहिसर पोलिसांनी अटक केली. एस. के. अनिसुर सिलेम, सोमनाथ गमू हसदा, रज्जाक हुसैन मलिक आणि शेख जाईद अली अशी या चौघांची नावे आहेत. या आरोपींकडून चोरीचे काही सोने जप्त करण्यात आले असून उर्वरित सोने लवकरच हस्तगत केले जाणार आहे. अटकेनंतर चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मेहुल ईश्वरभाई सोनी हे दहिसर येथे राहत असून त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. दहिसर परिसरात त्यांचा एक गाळा असून ते विविध व्यापार्‍याकडून सोने घेऊन त्यांना दागिने बनविण्याचे काम करतात. याच कारखानयात एस. के अनिसुरसह इतर पाच कारागिर कामाला आहेत. 1 एप्रिलला त्यांनी काही व्यापार्‍याकडून 1360 ग्रॅम वजनाचे सोने घेतले होते. त्यात काही सोने टाकून त्यांनी संबंधित व्यापार्‍यांना 1680 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बनवून दिले होते. दर महिन्यांप्रमाणे त्यांनी एप्रिल महिन्यांत दागिन्यांचा हिशोब केला असता त्यात 264 ग्रॅम वजनाचे सोने कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. तेव्हापासून त्यांचा कारागिर एस. के अनिसुर हा अचानक कामावर येणे बंद झाला होता. वारंवार संपर्क साधूनही त्याचा संपर्क झाला नाही.

चौकशीअंती एस. के अनिसुर याने 1 एप्रिल ते 9 मे 2025 या कालावधीत कारखान्यातून 24 लाख 15 हजार रुपयांचे 264 ग्रॅम वजनाचे सोने चोरी करुन पलायन केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच मेहुल सोनी यांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच आरोपी कारागिराचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तीन दिवसांपूर्वी एस. के अनिसुरला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्याला सोमनाथ याने मदत केली होती. त्यामुळे त्यालाही नंतर पोलिसांनी अटक केली.

दुसर्‍या चोरीच्या गुन्ह्यांत रज्जाक मलिक आणि शेख अली या दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. अजानमियाँ नानू गाजी हे कांदिवलीतील रहिवाशी असून तेथीलच इस्लाम कंपाऊंडमध्ये त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. त्यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून रज्जाक मलिक हा कामाला होता. काही दिवसांपूर्वी अजानमियाँ यांनी त्याला काही दागिने बनविण्यासाठी दिले होते. यावेळी त्याने साडेतीन लाखांचे तीन सोन्याचे नेकलेस चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच कांदिवली पोलिसांनी पळून गेलेल्या कारागिराचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रज्जाक मलिकसह त्याला मदत करणार्‍या शेख अली या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page