पत्नीसह मुलाची हत्या करुन आत्महत्येचा बनाव करणार्या पतीला अटक
अनैतिक संबंधाच्या संशयातून घडलेला प्रकार; पत्नीची हत्या करताना पाहिले म्हणून मुलालाही संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जानेवारी २०२५
मुंबई, – कांदिवली येथे पत्नीसह आठ वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या करुन आत्महत्येचा बनाव करणार्या आरोपी पतीला अखेर समतानगर पोलिसांनी अटक केली. शिवशंकर सुकेंद्र दत्ता असे या ४० वर्षीय आरोपी पतीचे नाव असून दुहेरी हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन त्याने आधी पत्नीची गळा आवळून हत्या करुन तिने आत्महत्या केल्याचे चित्र निर्माण केले. ही हत्या करताना मुलाने पाहिले होते, तो हत्येचा साक्षीदार होता, त्यामुळे त्याने स्वतच्या मुलाचीही हत्या करुन त्यानेही गळफास घेतल्याचे दाखवून घटनास्थळाहून पलायन केले होते. पोलीस तपासात हा प्रकार उघडकीस येताच शिवशंकरवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
कांदिवलीतील नरसीपाडा, डिलक्स हॉटेलमागील सरस्वती चाळीत गेल्या एक वर्षांपासून शिवशंकर दत्ता हा त्याची पत्नी पुष्पा आणि आठ वर्षांच्या मुलासोबत राहत होता. शिवशंकर आणि पुष्पा यांच्यातील संबंध फारसे चांगले नव्हते. त्यातच पुष्पाही स्थानिक लोकांशी जास्त बोलत नव्हती. शिवशंकर हा टेम्पोचालक तर त्याची पत्नी गृहिणी आहे. तिचा मुलगा याच परिसरातील एका शाळेत दुसरीत शिकत होता. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता शिवशंकर हा घरी आला होता. मात्र दार ठोठावून पुष्पाने दरवाजा उघडला नाही. बराच वेळ होऊन तिने दरवाजा न उघडल्याने त्याला संशय आला. त्यामुळे त्याने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी त्याला त्याच्या पत्नीसह मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या दोघांनाही गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून तिथे उपस्थित स्थानिक रहिवाशांना धक्काच बसला होता.
ही माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या दोघांना कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. या दुहेरी आत्महत्येच्या घटनेची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. पुष्पाने आधी तिच्या आठ वर्षांच्या मुलाला गळफास लावून हत्या केली आणि नंतर स्वतला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज होता. मात्र शिवशंकरविषयी माहिती काढताना त्याच्यावरही पोलिसांना संशय निर्माण झाला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीदरम्यान तो दिशाभूल आणि विसंगत माहिती देत होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय निर्माण झाला होता. तांत्रिक तपास आणि विश्लेषणाच्या आधारे त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच पुष्पासह त्याच्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. त्याला पुष्पाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. याच रागातून त्याने पुष्पाची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच दोरीने तिने गळफास घेतला आहे असा बनाव केला. पत्नीची हत्या करताना त्याला त्याच्या मुलाने पाहिले होते. या गुन्ह्यांतील तो साक्षीदार होता. त्यामुळे त्याने त्याचीही नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. तसेच मुलानेही गळफास लावून आत्मह्तया केल्याचा बनाव रचला होता.
या दोन्ही हत्येनंतर तो घरातून पळून गेला होता. दुपारी घरी आल्यानंतर त्याने स्थानिक रहिवाांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सर्वांना या दोघांनाही गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. मात्र शिवशंकरच्या चौकशीतून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे उघडकीस आले. तपासात आलेल्या या माहितीनंतर शिवशंकरला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.