एक कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी आरोपीस अटक

नगरसेवक अशोक सावंत यांच्यासारखा गेम करण्याची धमकी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ जून २०२४
मुंबई, – कांदिवलीतील समतानगर परिसरात सुरु असलेल्या म्हाडा पुर्नविकास इमारतीच्या बांधकाम साईटवरील प्रोजेक्ट प्रमुखांना एक कोटीची खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी आऊ ऊर्फ मधुकर सखाराम मासावकर या आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खंडणीची रक्कम दिली नाहीतर नगरसेवक अशोक सावंत यांच्यासारखा गेम करु अशी धमकी देण्यात आल्याचे संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सतीश बाबू हेगडे हे अंधेरी येथे राहत असून एसडी कार्पोरेशन कंपनीत उपमहाव्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीने कांदिवलीतील समतानगर परिसरातील म्हाडाच्या काही इमारतीचे पुर्नविकासाचे काम हाती घेतले होते. २००७ साली समतानगर येथील ऐंशी सोसायटीचे कंपनीकडून पुर्नविकास करण्यात येत असून त्यात २८०० फ्लॅटधारकांचा समावेश आहे. या सर्व सोसायटींनी मिळून समतानगर सहकारी सोसायटी युनियन लिमिटेड या संस्थेची स्थापना केली आहे. दर पाच वर्षांनी संस्थेची निवडणुक होत असून येणार्‍या पदाधिकारी आणि सभासदांशी चर्चा करुन पुर्नविकासाचे काम केले जात आहे. कंपनीने आतापर्यंत दोन हजार फ्लॅटचा स्थानिक रहिवाशांना ताबा दिला असून उर्वरित फ्लॅटचा ताबा देण्याचे काम सुरु आहे. पूर्वी या संस्थेत मधुकर मासावकर हा सभासद म्हणून काम पाहत होता. नंतर झालेल्या निवडणुकीत तो निवडून आला नाही. गेल्या चौदा वर्षांपासून सखाराम हा इमारतीच्या कामासाठी कंपनीच्या कर्मचार्‍यांना धमकी देत होता. काम करण्याच्या मोबदल्यात कंपनीकडे सतत पैशांची मागणी करत होता. सतत त्याच्याकडून खंडणीची मागणी होत असल्याने कंपनीच्या वतीने समतानगर पोलिसांसह खंडणीविरोधी पथकात सखारामविरुद्ध तक्रार केली होती. मात्र नंतर त्याने माफी मागून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो काही वर्ष शांत झाला होता, मात्र गेल्या दिड वर्षांपासून तो सतत कंपनीच्या प्रोजेक्ट प्रमुखांना धमकी देत त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. चार महिन्यांपूर्वी त्यांनी कंपनीचे प्रोजेक्ट प्रमुख मुकेश वाघेला यांच्याकडे एक कोटीची खंडणीची मागणी केली.

हा प्रकार त्यांनी त्यांचे मालक दिलीप ठक्कर यांना सांगितली होती. खंडणीची रक्कम दिली नाहीतर तर ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी कांदिवली परिसरात स्थानिक नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या झाली होती, त्याप्रमाणे त्यांना भरस्त्यात गोळ्या झाडू, माझे माणसे आता जेलमधून बाहेर आले आहे अशी धमकी दिली होती. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र मधुकर मासावकर हा त्यांना सतत त्यांच्याकडे खंडणीची मागणी करुन त्यांच्या प्रोजेक्टमध्ये एक व्यावसायिक गाळ्याची मागणी करत होता. पैसे किंवा गाळा दिला नाहीतर त्यांना तिथे बांधकाम करता येणार नाही अशी धमकी देेत होता. मधुकर मासावकर याच्याकडून येणार्‍या सतत खंडणीसह जिवे मारण्याच्या धमकीनंतर सतीश हेगडे यांनी कंपनीच्या वतीने समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी एक कोटी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या घटनेची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी मधुकर मासावकर याला कांदिवलीतून अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

तपासात मासावकर याच्याविरुद्ध खंडणीविरोधी पथकाने अशाच प्रकारे एक गुन्हा दाखल केला होता. त्यात त्याला जामिन मंजूर झाला होता. त्याचे काही गुंड प्रवृत्तीशी लोकांशी संबंध असल्याचे बोलले जाते. त्याने अशाच प्रकारे इतर काही विकासकांना खंडणीसाठी धमकी दिली आहे का, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक पुष्पक इंगळे हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page