मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मार्च 2025
मुंबई, – अपहरणासह खंडणीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. भूषण मुकूंदमुरारी सिंग असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कांदिवली परिसरात भूषणची एक टोळी असून ही टोळी स्थानिक दुकानदारासह व्यापार्याना धमकावून खंडणी वसुली करते. या गुन्ह्यांत रोहन गुप्ता, कलीम शेख यांच्यासह सहाजणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असलेला आलोक रामचंद्र शर्मा हा कांदिवलीतील इराणीवाडीत राहत असून त्याचा सुपारी विक्रीचा व्यवसाय आहे. पूर्वी तो गुटखा विक्री करत असल्याने भूषण सिंग व त्याच्या सहकार्यांना दरमाह हप्ता देत होता. नंतर त्याने गुटखा विक्रीचा धंदा बंद केला होता, तरीही भूषण व त्याचे सहकारी त्याला खंडणीसाठी धमकावत होते. मात्र त्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. पंधरा दिवसांपूर्वी त्याची कलीम शेखने भेट घेऊन त्याला कांदिवली व मालवणी परिसरात पुन्हा धंदा सुरु करायचा असेल तर भूषणभाईला दरमाह चार लाखांचा हप्ता द्यावा लागेल अशी धमकी दिली होती. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. तरीही ही टोळीला त्याला सतत खंडणीसाठी धमकी देत होती.
31 डिसेंबर 2024 रोजी तो कांदिवली येथून जात होता. यावेळी भूषणसह त्याच्या इतर सहा ते सात सहकार्यांनी त्याचे खंडणीसाठी अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याच्याविरुद्ध खोटी गुटख्याची केस बनवून त्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली होती. काही तास परिसरात फेरफटका मारल्यानंतर त्यांनी त्याला सोडून दिले होते. या आरोपींच्या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याने शताब्दी रुग्णालयात उपचार घेतले होते.
उपचारानंतर त्याने घडलेला प्रकार कांदिवली पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भूषण सिंग व त्याच्या सहकार्याविरुद्ध अपहरणासह खंडणी, मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत भूषण सिंग हा तीन महिन्यांपासून फरार होता. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वी कांदिवली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.