मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – आंघोळ करताना डॉक्टर तरुणीचा व्हिडीओ काढल्याप्रकरणी कांदिवलीतील एका शासकीय हॉस्पिटलच्या ४१ वर्षांच्या सफाई कर्मचार्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
तक्रारदार तरुणी ही डॉक्टर असून ती सध्या कांदिवलीतील शासकीय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करते. हॉस्पिटलच्या वसतिगृहातील तिसर्या मजल्यावर ती तिच्या डॉक्टर मैत्रिणीसोबत राहते. मंगळवारी सकाळी नऊ वाजता ती आंघोळ करत होती. यावेळी तिला कोणीतरी तिला पाहत असल्याचा संशय आला. काही वेळानंतर ती बाहेर आली असता तिला आरोपी तिथे सफाई करताना दिसला. त्यामुळे तिने त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये ती आंघोळ करताना व्हिडीओ दिसून आला. हा प्रकार तिने तिच्या वरिष्ठांना सांगून कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने डॉक्टर तरुणीचे आंघोळ करताना मोबाईलवरुन व्हिडीओ काढल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यांतील मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. या तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आले.
आरोपी हा हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून करतो. सकाळी तो तिसर्या मजल्यावर सफाई करताना त्याला ही तरुणी आंघोळ करत असल्याचे समजले. त्यानंतर त्याने बाथरुमच्या खिडकीजवळ मोबाईल ऑन करुन तिचे आंघोळ करताना व्हिडीओ काढले होते. मात्र तिला संशय आल्यानंतर तो मोबाईल घेऊन निघून गेला होता. दरम्यान या घटनेची वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांनी गंभीर दखल घेतली आहे. लवकरच या कर्मचार्यावर हॉस्पिटल प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.