कांदिवलीतील जय भवानी ज्वेलर्समध्ये रॉबरीचा प्रयत्न
मालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रयत्न फसल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – घातक शस्त्रांचा धाक दाखवून कांदिवलीतील जय भवानी ज्वेलर्समध्ये रॉबरीच्या उद्देशाने तिघांनी प्रवेश केला, मात्र मालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवून एका आरोपीच्या हातावर जोरात फटका मारल्यामुळे त्यांचा रॉबरीचा प्रयत्न फसला गेला. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी रॉबरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपींचा बोरिवली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेने स्थानिक व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जलाराम ओगडराम देवाशी हे ज्वेलर्स व्यापारी आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील पोयसर डेपोसमोरील लेडी फातिमा रोड, जॉनरोस अपार्टमेंटमध्ये राहतात. तिथे त्यांच्या मालकीचे जय भवानी नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता ते त्यांचा भाऊ जितेंद्र देवासी आणि ओगटराम देवासी यांच्यासोबत दुकानात बसले होते. याच दरम्यान दुकानात तीन अज्ञात तरुणांनी प्रवेश केला. या तिघांनी चाकू आणि गावठी कट्ट्याचा धाक दाखवून तिथे रॉबरीचा प्रयत्न केला होता. सोन्याच्या दागिन्यासह कॅशची मागणी करुन या तिघांनी त्यांना धमकी दिली होती. मात्र जलाराम यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून त्यातील एका आरोपीच्या हातावर काठीने जोरात फटका मारला. त्यानंतर त्यांनी केलेल्या आरडाओरडानंतर तिथे लोकांची गर्दी जमा झाली होती. या प्रकाराने तिथे गोधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
रॉबरीचा प्रयत्न फसल्याचे लक्षात येताच तसेच लोकांच्या हाती लागण्यापूर्वीच ते तिघेही तेथून पळून गेले होते. ही माहिती जलाराम देवासी यांच्याकडून मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरुन तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या तिघांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. दुकानातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये रॉबरीचा हा प्रकार कैद झाला असून बारा सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमुळे तिन्ही आरोपींची ओळख पटली नसली तरी ते तिघेही सराईत गुन्हेगार असावेत असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेलाही तपासाचे आदेश दिले होते. त्यामुळे पळून गेलेल्या आरोपींचा गुन्हे शाखेचे अधिकारीही शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.