विविध शासकीय विभागात नोकरीच्या आमिषाने 1.54 कोटीची फसवणुक
बोगस नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन गंडा घालणार्या तेराजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 एप्रिल 2026
मुंबई, – विधानभवन, महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, टपाल खाते आदी विविध शासकीय नोकरीच्या आमिषाने दहाजणांची 1 कोटी 54 लाख 50 हजाराची फसवणुक करुन आरोपींनी पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तेराजणांविरुद्ध बोगस नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सतीश वानखेडे, शरद दत्तात्रय राजगुरु, बाळासाहेब धोंडीबा कांबळे, डॉ. मंगेश बाबूराव पाटील, धवल मंगेश पाटील, प्रमोद सोलापुरे, विनोद उर्खाडा माळी, रविंद्र गोविंद कांबळे, जितेंद्र युवराज चौधरी, अभय अशोक पाटील, कमलेश गांधलिकर, दिनेश निकाळे आणि यतीन मोरे अशी या तेराजणांची नावे आहेत. संबंधित आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत दहा तक्रारदारांनी त्यांची 1 कोटी 54 लाख 50 हजाराची तक्रार पोलिसांत केली असून हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सुशील भालचंद्र पाटील हे कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत असून त्यांचा बांधकाम कॉन्ट्रक्टरचा व्यवसाय आहे. 2016 साली त्यांच्या एका मित्राने त्यांची सतीश वानखेडेशी ओळख करुन दिली होती. या ओळखीत त्याने त्याचे परिचित काहीजण शासकीय नोकरी करत असून त्यांची वेगवेगळ्या विभागात चांगली ओळख आहे. संबंधित व्यक्ती कुठलीही परिक्षा न देता थेट सरकारी नोकरी लावतात असे सांगून त्यांना व्हॉटअपवर काही नोकरी मिळाल्याचे नियुक्तीपत्र पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला त्यांच्यासाठी शासकीय नोकरीबाबत विनंती केली होती. यावेळी त्याने त्यांना राज्य उत्पादन शुल्क, मुंबईसह ठाणे मनपा आणि विधानभवनात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यसाठी किमान 60 लाख रुपये खर्च अपेक्षित असून सुरुवातीला 20 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. सरकारी नोकरी मिळत असल्याने त्यांनी त्याला होकार दर्शविला होता.
याच दरम्यान सतीशने त्यांचे सर्व वैयक्तिक, शैक्षणिक कागदपत्रे घेतले होते. जून 2019 रोजी त्याने त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांच्याकडून त्याने दहा लाख रुपये घेतले होते. मात्र सहा महिने उलटूनही त्याने त्यांचे काम केले नाही. विचारणा केल्यानंतर त्याने नोकरी भरती स्थगित झाली असून त्यांना ठाण्यातील मनपामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून आणखीन दहा लाख रुये घेतले होते. याच दरम्यान त्याने त्यांच्या परिचित आणखीन कोणीही शासकीय नोकरीसाठी इच्छुक आहेत का याबाबत विचारणा करुन त्यांनाही नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या परिचितांना ही माहिती सांगितली होती. सुशील पाटील यांच्यावर विश्वास ठेवून हर्षदा सूर्यवंशी, प्रियांका शर्मा, गणेश कोठावदे, रामेश्वरी गायकवाड, निलेश साळवे, ललित बच्छाव, सारीका जगताप आणि शंकर चौधरी यांनीही नोकरीसाठी सतीश वानखेडेशी संपर्क साधला होता.
या सर्वांची त्यांच्याच घरी एक मिटींग झाली होती. याच मिटींगमध्ये त्याने त्यांचे काम शरद राजगुरु, बाळासाहेब कांबळे, डॉ. मंगेश पाटील, धवल पाटील, प्रमोद सोलापुरे, विनोद माळी, रविंद्र कांबळे, जितेंद्र चौधरी, अभय पाटील, कमलेश गांधलिकर, दिनेश निकाळे आणि यतीन मोरे आदी शासकीय अधिकारी करणार असून त्यांना आगाऊ काही रक्कम द्यावे लागतील. ही रक्कम दिल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या शासकीय विभागात नोकरीचे आश्वासन देऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. ठरल्याप्रमाणे हर्षदा सूर्यवंशी हिच्याकडून विधानभवन येथे प्रतिवेदक पदासाठी वीस लाख, प्रियांका शर्माकडून मनपामध्ये क्लार्क पदासाठी पंधरा लाख, सत्यजीत परदेशी यांच्याकडून सार्वजनिक आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदासाठी अठरा लाख, गणेश कोठावदे व शंकर चौधरीकडून आयकर विभागात सिनिअर क्लार्क पदासाठी अनुक्रमे बावीस व साडेबारा लाख, रामेश्वर गायकवाड, निलेश साळवे, ललित बच्छाव, सारीका जगताप यांच्याकडून अनुक्रमे दहा, बारा, दहा आणि पंधरा लाख रुपये असे 1 कोटी 34 लाख 50 हजार रुपये घेतले होते.
या नऊजणांसह सुशील पाटील यांच्याकडून त्यांनी जवळपास बावीस लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत सुशीलसह इतर आरोपींनी संबंधित दहाजणांना नोकरी दिली नाही. सतत विचारणा केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या शासकीय विभागाचे नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. या नियुक्तीपत्राची शहानिशा केल्यानंतर ते बोगस असल्याचे उघडकीस आले होते. अशा प्रकारे 2019 पासून सतीशसह इतर बाराजणांनी त्यांच्यासह इतर दहाजणांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 1 कोटी 54 लाख 50 हजार रुपये घेतले होते, मात्र कोणालाही नोकरी न देता, बोगस नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन फसवणुक केली होती. त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा संबंधित आरोपींनी परस्पर अपहार केला होता.
हा प्रकार उघडकीस येताच सुशील पाटील यांच्यासह इतर नऊजणांनी चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित तेरा आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सतीश वानखेडे याच्यासह शरद राजगुरु, बाळासाहेब कांबळे, डॉ. मंगेश पाटील, धवल पाटील, प्रमोद सोलापुरे, विनोद माळी, रविंद्र कांबळे, जितेंद्र चौधरी, अभय पाटील, कमलेश गांधलिकर, दिनेश निकाळे आणि यतीन मोरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन दहाजणांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.