मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जानेवारी २०२५
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित तीन तरुणांनी सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. बदनामीसह जिवे मारण्याची धमकी देऊन पिडीत मुलीला तिघांनी धमकाविले होते. याप्रकरणी सामूहिक लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याची, बदनामी करण्याची धमकी देणे तसेच पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच शुक्रवारी तिन्ही आरोपी तरुणांना समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पिडीत मुलीसह तिन्ही आरोपींची लवकरच मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या सामूहिक लैगिंक अत्याचाराच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
पिडीत मुलगी ही सतरा वर्षांची असून ती कांदिवली परिसरात तिच्या पालकांसोबत राहते. याच परिसरात तिन्ही आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. ६ जानेवारीला ते तिघेही पिडीत मुलीला एका आरोपीच्या घरी घेऊन गेले होते. तिथेच या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर बदनामीसह तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. बदनामीसह जिवाच्या भीतीने हा प्रकार तिने कोणालाही सांगितला नाही. मात्र याच आरोपीकडून ही माहिती इतर तरुणांना समजली होती. ही माहिती नंतर पिडीत मुलीच्या पालकांना समजली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीची चौकशी केली होती. यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यांनतर त्यांनी तिला समतानगर पोलीस ठाण्यात आणले.
तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या तिघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पिडीत मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर या तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली. यातील एक तरुण अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरी बालसुधारगृहात पाठविण्यात येणार आहे.
वयोवृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार
२० वर्षांच्या आरोपीला अटक
अन्य एका घटनेत गोरेगाव येथे राहणार्या एका ७७ वर्षांच्या महिलेवर तरुणाने लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच २० वर्षांच्या तरुणाला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. ४९ वर्षांची तक्रारदार महिला ही गोरेगाव परिसरात राहत असून तिच्या घरापासून काहीच अंतरावर तिची पिडीत वयोवृद्ध आई राहते. ८ जानेवारीला तिची आई तिच्या घरी एकटीच झोपली होती. यावेळी घरवाजा उघडा असल्याची संधी साधून प्रकाश नावाचा एक तरुण तिच्या घरात घुसला. त्याने तिच्या वयोवृद्ध आईसोबत जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर तो पळून गेला होता. हा प्रकार नंतर तक्रारदार महिलेला तिच्या आईने सांगितला. या घटनेनंतर तिने दिडोंशी पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचाराचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही घटना परिसरातील सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.