झटपट श्रीमंत होण्यासाठी एमडी ड्रग्जच्या विक्रीचा प्रयत्न फसला
पहिल्याच प्रयत्नात दोघांना 1.06 कोटीच्या ड्रग्जसहीत अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 सप्टेंबर 2025
मुंबई, – काहीच कामधंदा नसल्याने स्वतचा व्यवसाय म्हणून एमडी ड्रग्जचा विक्रीचा प्रयत्न करणार्या दोन तरुणांना कांदिवली युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी गोरेगाव परिसरातून अटक केली. झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी राजस्थानाहून आणलेला एमडी ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न केला होता, मात्र पहिल्याच प्रयत्नात ते दोघेही पकडले आणि स्वतचा एमडी ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय सुरु होण्यापूर्वीच बंद झाला. या दोघांकडून पोलिसांनी 427 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत एक कोटी सहा लाख रुपये इतकी आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोरेगाव परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी गोरेगाव परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. सोमवारी रात्री उशिरा पावणेदोन वाजता तिथे दोन तरुण आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटत होती, त्यामुळे त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एक कोटी सहा लाख रुपयांचे 427 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले.
तपासात अटक दोन्ही आरोपी उत्तर मुंबईतील मालाड परिसरात राहत असून ते काहीच कामधंदा करत नाही. त्यांना झटपट श्रीमंत व्हायचे होते. सरळ मार्गाने श्रीमंत होणे कठीण असल्याने त्यांनी एमडी ड्रग्जचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ते दोघेही अलीकडेच राजस्थानला एमडी ड्रग्ज खरेदीसाठी गेले होते. तेथून त्यांनी 427 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज खरेदी केले. मुंबईत एमडी ड्रग्जला प्रचंड मागणी असल्याने त्यांनी मुंबईतच या ड्रग्जची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.
ठरल्याप्रमाणे ते दोघेही सोमवारी रात्री गोरेगाव परिसरात ड्रग्जची विक्रीसाठी आले होते, मात्र ड्रग्जची विक्री करण्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. झटपट श्रीमंत होण्यासाठी ड्रग्जची विक्री करण्याचा त्यांचा पहिलाच प्रयत्न फसला गेला. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवार 6 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ते ड्रग्ज कोणी दिले, ते ड्रग्ज ते कोणाला विक्री करणार होते याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.