मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ जून २०२४
मुंबई, – कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज, जानूपाडा रोड परिसरात रस्त्यावरुन जाणार्या दोन अल्पवयीन मुलीसह तीन तरुणींना अश्लील स्पर्श करुन विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रोहित या २५ वर्षांच्या रिक्षाचालकास समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी पावणेदोन ते सायंकाळी सातच्या सुमारास रोहितने या दोन मुलीसह तीन तरुणींशी विविध परिसरात अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचे पोलिसांनी सांगितले.
१५ वर्षांची तक्रारदार मुलगी ही तिच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहते. याच परिसरातील एका नामांकित शाळेत ती शिकत असून शुक्रवारी ती क्लासवरुन घरी जात होती. यावेळी तिला एक रिक्षाचालक वेडीवाकडी वळणे घेत रिक्षा चालवत असल्याचे दिसून आले. काही वेळानंतर तो तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्या छातीला अश्लील स्पर्श करुन विनयभंग केला होता. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. अशाच प्रकारे दुपारी तीन ते सायंकाळी सातच्या दरम्यान अन्य एका सतरा वर्षांच्या मुलीसह १९ ते २७ वयोगटातील तीन तरुणींचा विनयभंग झाला होता. कांदिवलीतील जानूपाडा रोड, ठाकूर व्हिलेज परिसरात या पाचही घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर या दोन्ही मुलीसह तिन्ही तरुणींनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता.
या घटनेची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल घेत दोषी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याच्याविरुद्ध ठोस कारवाईचे आदेश समतानगर पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी पंधरा वर्षांच्या मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध ३५४ भादवीसह ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत रोहितला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत रोहितनेच पाचही गुन्हे केल्याची कबुली दिली. यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते. दारुच्या नशेत त्याने या दोन्ही मुलीसह तिन्ही तरुणींचा विनयभंग केला होता. रोहित हा रिक्षाचालक असून सध्या कांदिवली परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाच दिवशी पाच तासांच्या अंतराने पाच मुलीसह तरुणींच्या विनयभंगाच्या घटनेने परिसरातील महिला वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.