मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२४
मुंबई, – पतीसोबत शारीरिक संबंधाचे अश्लील फोटोसह व्हिडीओ पोर्न साईटसह सोशल मिडीयावर व्हायरल करुन एका २३ वर्षांच्या महिलेची बदनामीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच तक्रारदार महिलेच्या आरोपी मित्राला समतानगर पोलिसांनी अटक केली. जोशुआ फ्रॉन्सिस असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
२३ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या आई-वडिल, दोन भाऊ आणि बहिणीसोबत कांदिवली येथे राहत असून तिच्या वडिलांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. तिचा विनोद नावाच्या एका तरुणासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र पतीला दारुचे व्यसन असल्याने त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. पतीसोबत पटत नसल्याने ती तिच्या माहेरी निघून आली होती. २६ जूनला तिचा मित्र जोशुआ फ्रॉन्सिस याने तिला व्हॉटअपवर कॉल करुन तिचे तिच्या पतीसोबत शारीरिक संबंधाचे व्हिडीओ पोर्न साईटवर अपलोड झाल्याची माहिती दिली होती. तसेच त्याने तिला संबंधित पोर्ट साईटची लिंक पाठवून दिली होती. त्यामुळे तिने ती लिंक ओपन केली असता तिला तिच्या पतीसोबत वैयक्तिक खाजगी व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याचे दिसून आले. ते व्हिडीओ तिच्या पतीने त्याच्या मोबाईलवर काढले होते. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
याच दरम्यान जोशुओने तिला तिचा विकास नावाचा एक मित्र असून तो तो सायबर तंज्ञ आहे. तो तिचे फोटो आणि व्हिडीओ संबंधित पोर्न साईटवरुन काढून टाकेल. त्यासाठी त्याला पन्नास हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. संबंधित व्हिडीओ आणि फोटो लवकर काढले नाहीतर ते आणखीन व्हायरल होतील आणि तिची बदनामी होईल असे जोशुआने तिला सांगितले होते. त्यामुळे तिने विकासला फोन करुन ते फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्याची विनंती केली होती, मात्र त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. पैसे दिल्यानंतर आपण फोटो आणि व्हिडीओ डिलीट करुन से सांगितले. काही दिवसांनी तिचे व्हिडीओ अज्ञात व्यक्तीने इंटाग्रामवर व्हायरल केले होते. त्यामुळे तिची प्रचंड बदनामी झाली होती. या घटनेनंतर तिने घडलेला प्रकार समतानगर पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ७९ भारतीय न्याय संहिता सहकलम ६६ (ई), ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण राणे यांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखेसह सायबर सेल पथकाने तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी तक्रारदार महिलेचा मित्र जोशुओ फ्रॉन्सिस याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच तिचे तिच्या पतीसोबत अश्लील फोटो आणि व्हिडीओ पोर्न साईटसह सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.