पाच वर्षांच्या दोन मुलींचा सुरक्षारक्षकाकडून विनयभंग
विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत सुरक्षारक्षकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जून 2025
मुंबई, – पाच वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीचा 59 वर्षांच्या सुरक्षारक्षकानेच अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याच गुन्ह्यांत आरोपी सुरक्षारक्षकाला समतानगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
30 वर्षांची तक्रारदार महिला ही कांदिवली परिसरात राहते. याच परिसरात तिची मैत्रिण राहत असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. 25 मेला तिची मुलगी घराजवळ खेळत होती. यावेळी तिथे आरोपी सुरक्षारक्षक आला. त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. 29 मेला तक्रारदार महिलेची पाच वर्षांची मुलगी तिथेच तिच्या मैत्रिणीसोबत खेळत होती. यावेळी आरोपी सुरक्षारक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार दोन्ही मुलींकडून तक्रारदार महिलेला समजला होता. ही माहिती समजताच तिने समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध तक्रार केली होती.
याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच गुरुवारी रात्री उशिरा आरोपीला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने परिसरातील इतर काही अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान गुरुवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.