मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ एप्रिल २०२४
मुंबई, – वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रेयसीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. हेमकुमारी मोतीराम भट ऊर्फ शानू असे या प्रेयसीचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकर डांबरबहादूर खडके विश्वकर्मा (३०) याला समतानगर पोलिसांनी अटक केली. ते दोघेही मूळचे नेपाळचे रहिवाशी असून क्षुल्लक भांडणातून हा प्रकार घडल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण राणे यांनी सांगितले. अटकेनंतर डांबरबहादूरला बोरिवलीतील लोकल कोर्टाने गुरुवार १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शानू ही महिला मूळची नेपाळची रहिवाशी असून ती कांदिवलीतील अशोकनगर परिसरात केअरटेकर म्हणून कामाला आहे. तिथेच डांबरबहादूर हा सुरक्षाक्षक म्हणून काम करत होता. तोदेखील मूळचा नेपाळचा रहिवाशी आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची सोशल मिडीयावरुन ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. १४ एप्रिलला शानूचा वाढदिवस होता. तिला तिचा वाढदिवस डांबरबहादूरसोबत साजरा करायचा होता. त्यामुळे शनिवारी १३ एप्रिलला सायंकाळी ती त्याच्या घरी राहण्यासाठी आली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्याची आई घरी होती. या दोघांनी रात्री वाढदिवस साजरा करुन मद्यप्राशन केले होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले होते. राग अनावर झाल्याने त्याने शानूला जोरात भिंतीवर आदळले. त्यात ती जागीच कोसळली. तिची काहीच हालचाल नव्हती. त्यामुळे तो प्रचंड घाबरला. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच सोसायटीच्या रहिवाशांनी ही माहिती समतानगर पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण राणे, पोलीस निरीक्षक पुष्पक इंगले यांच्यासह अन्य पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. बेशुद्धावस्थेत असलेल्या शानूला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी प्रियकर डांबरबहादूरचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण राणे, पोलीस निरीक्षक पुष्पक इंगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गंगापूरकर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक हर्षद इंगोले, पोलीस हवालदार गायकवाड, पाटणे, निजाई व अन्य पोलीस पथकाने काही तासांत डांबरबहादूरला अटक केली. चौकशीत त्याने क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शानू हिचे दोन लग्न झाले असून तिला तीन मुले आहेत. तिन्ही मुले तिच्या आईसोबत नेपाळमध्ये राहत आहेत. डांबरबहादूर हादेखील विवाहीत असून त्याची पत्नी नेपाळला राहते. काही दिवसांपूर्वी त्याची आई त्याच्यासोबत राहण्यासाठी कांदिवली येथे आली होती. वाढदिवसाच्या दिवशीच शानूची तिच्या प्रियकराने हत्या केल्याने परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती.