मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मार्च 2025
मुंबई, – फुटपाथवर आईसोबत झोपलेल्या एका चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीच्या मित्राविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहरणासह हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अक्षय गरुड असे या आरोपीचे नाव असून हत्येनंतर तो पळून गेला आहे. त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा पावणेदोन ते पहाटे चारच्या दरम्यान कांदिवलीतील इराणीवाडी, गल्ली क्रमांक दोन परिसरात घडली. फातिमा ऊर्फ सोनी अकबर अन्सारी ही 24 वर्षांची महिला नालासोपारा येथे राहते. तिचा पती अकबर हा लग्नात जेवण बनविण्याचे काम करत असून तो तिचा पहिला पती आहे. तिला पहिल पतीपासून चार वर्षांचा अंश आणि दहा महिन्यांची रेणू नावाची एक मुलगी आहे. 2019 साली तिचे कलवा जगतपाल सिंग या व्यक्तीशी विवाह झाला होता. मात्र त्यांच्यात सतत भांडणे होत असल्याने तिने त्याला 2023 साली सोडून दिले होते. पतीला सोडल्यांनतर ती काही महिने तिच्या आई-वडिलांकडे कांदिवलीतील इराणीवाडी येथे राहण्यासाठी आली होती. तिचे वडिल एका पायाने अपंग असून आई आजारी आहे. त्यांचा सांभाळ तिची बहिण बजरंग आणि सलोनी करतात. अक्षय हा तिच्या पहिल्या पतीचा मित्र असून तो तिचा मुलगा अंशला अनेकदा त्याच्या बाईकवरुन फिरायला घेऊन जात होता.
याच दरम्यान तिने अकबरशी दुसरा विवाह केला होता. आई आजारी असल्याने गुरुवारी 20 मार्चला ती तिच्या आईकडे आली होती. मात्र आई शताब्दी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यास तयार नसल्याने ती तिचा पती अकबर याच्या पोईसर येथील घरी आली होती. सकाळी तिला आईला घेऊन शताब्दी हॉस्पिटलमध्ये जायचे होते. त्यामुळे ती तिच्या पतीसोबत फुटपाथजवळ राहत होती. शुक्रवारी रात्री उशिरा पावणेदोन वाजता तिथे अक्षय आला आणि त्याने अंशला फिरायला घेऊन जातो असे सांगू लागला. मात्र त्याने मद्यप्राशन केल्याने तिने अंशला त्याच्यासोबत पाठविण्यास नकार दिला होता. त्यानंतर ते सर्वजण फुटपाथवर झोपले होते. रात्री साडेतीन वाजता तिची मुलगी रडू लागल्याने तिला जाग आली. यावेळी तिला अंश तिथे दिसला नाही. त्यामुळे तिने तिच्या पतीला ही माहिती सांगितली. त्यानंतर या सर्वांनी अंशचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही.
पहाटे चार वाजता तिची बहिण सलोनीला इराणीवाडीतील एका इमारतीच्या गेटसमोर अंश हा बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी अंशला तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला. त्यात अंशची हत्या झाल्याचे नमूद करण्यात आले होते. ही माहिती प्राप्त होताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी फातिमा अन्सारीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणासह हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर अज्ञात व्यक्ती अंशला घेऊन जात असल्याचे दिसून आले. ते सीसीटिव्ही फुटेज फातिमाला दाखविले असता तिने तो अक्षय गरुड असल्याचे ओळखले. अक्षयनेच अंशचे अपहरण करुन त्याची हत्या केली आणि नंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह तिथे टाकून पलायन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पळून गेलेल्या अक्षय गरुडचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून शोध सुरु आहे.