कांदिवलीत इमारतीच्या दुसर्या मजल्यावरुन सहकार्याला ढकळले
सहकार्याचा मृत्यू तर हत्येप्रकरणी आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2025
मुंबई, – कांदिवलीतील एका निर्माणधीन इमारतीच्या दुसर्या मजल्यावरुन जितेंद्र चौहाण या तरुणाला त्याच्याच सहकारी मित्राने ढकळून दिले. गंभीररीत्या जखमी झालेल्या जितेंद्रचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या आरोपी सहकार्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. अफसर जमीरउद्दीन आलम असे या 25 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला सोमवारी सायंकाळी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मोबाईल जोरात बोलत असल्याने सावधास बोल असे सांगितल्यानंतर जितेंद्रने अफसरच्या कानशिलात लागली. त्याचा राग आल्याने त्याने जितेंद्रला दुसर्या मजल्यावरुन ढकळून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना रविवारी रात्री सव्वादहा वाजता कांदिवलीतील भाटिया स्कूलसमोरील साईबाबा नगर, पी-दोन, दैवी इंटरसिटी या निर्माणधीन इमारतीमध्ये घडली. मनोज कल्लू चव्हाण हा मूळचा उत्तरप्रदेश, मिर्झापूरचा रहिवाशी असून व्यवसायाने कारपेंटर आहे. सध्या तो कांदिवलीतील भाटिया स्कूलसमोरील साईबाबा नगर, पी-दोन, दैवी इंटरसिटी या निर्माणधीन इमारतीमध्ये कामाला आहे. यापूर्वी त्याने मृत जितेंद्र चौहाण आणि आरोपी अफसर आलम यांच्यासोबत कांदिवलीतील दामूनगर परिसरात एकत्र काम केले आहे. दैवी इंटरसिटीमध्ये कामाला लागण्यापूर्वी तिथे अफसर आलम हा कामाला होता. याच साईटवर त्याच्यासोबत दहा ते बारा कामगार कारपेंटर म्हणून कामाला आहे. दिवसभर काम करुन ते सर्वजण तिथे राहतात.
रविवारी रात्री नऊ वाजता मनोज हा त्याचा मित्र सत्येंद्र बहादूरसोबत दुसर्या मजल्यावरील मोकळ्या जागेत बसून मोबाईलवर आयपीएलची मॅच पाहत होत. यावेळी तिथे अफसर आला आणि त्याने त्यांच्याकडे तंबाखू मागितली. मात्र त्याने तंबाखू नसल्याने सांगितल्यानंतर तो त्यांच्यासोबत मॅच पाहू लागला. याच दरम्यान तिथे जितेंद्र चौहाण हा जेवण करुन मोबाईलवर गप्पा मारत होता. यावेळी अफसरने जितेंद्रला इतक्या मोठ्या आवाजात का बोलतोस, आरामात बोल ना अशी विचारणा केली. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले होते. त्यात जितेंद्रने अफसरला जोरात कानशिलात लगावली. त्याचा राग आल्याने त्याने त्याला दुसर्या मजल्यावरुन धक्का दिला होता.
दुसर्या मजल्यावरुन पडल्याने जितेंद्र हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तिथे उपस्थित कामगारांनी तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे उपचारादरम्यान जितेंद्रचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मनोज चव्हाण आणि सत्येंद्र बहादूर यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मनोजच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अफसर आलम याच्यविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अफसरला काही तासानंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने रागाच्या भरात जितेंद्रला दुसर्या मजल्यावरुन ढकळून दिल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला हत्येच्या गुन्ह्यांत अटक करुन सायंकाळी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.