घराबाहेर सामान ठेवण्यावरुन 72 वर्षांच्या महिलेची हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच 65 वर्षांच्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मे 2025
मुंबई, – घराबाहेर सामान ठेवण्यावरुन झालेल्या वादानंतर एका 65 वर्षांच्या वयोवृद्धाने त्याच्याच शेजारी राहणार्या एका 72 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. रंजना संघानी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी अशोक केसवाणी याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध हत्येच्या कलमांर्तत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. सायंकाळी घडलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
रंजना संघानी ही वयोवृद्ध महिला कांदिवलीतील एस. व्ही रोडवरील एका निवासी अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्याच शेजारी अशोक केसवाणी हा त्याच्या दिव्यांग बहिणीसोबत राहतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होता. हा वाद विकोपास गेला होता. सोमवारी सायंकाळी रंजनाने तिचे काही सामान बाहेर ठेवले होते. सामान ठेवण्यावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. तिने तिचे सामान घरात ठेवावे नाहीतर ते सर्व आपण फेंकून टाकू असे त्याने तिला सांगितले होते. त्यावर तिने सामान ठेवण्यास नकार दिला. माझे सामान माझ्या घरासमोर असून त्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असे सांगून त्याला उलट उत्तर दिले होते. यावेळी रागाच्या भरात त्याने तिच्यावर घरातून आणलेल्या चाकूने वार केले होते.
चार ते पाच वार केल्याने रंजना ही गंभीररीत्या जखमी झाली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशांकडून समजताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या रंजनाला तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अशोक केशवाणी याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यांतील चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी बोरिवली कोर्टात हजर केले जाणार आहे.