मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 सप्टेंबर 2025
मुंबई, – गावी जाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून हिमेंद्री दसा राणा या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना कांदिवलीतील चारकोप परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी पती दसा बैलोचन राणा याच्याविरुद्ध चारकोप पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर दसा हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना शनिवारी रात्री उशिरा एक वाजता कांदिवलीतील चारकोप, सेक्टर तीन, चारकोप डेपोजवळील रामविजय सहकारी सोसायटीमध्ये घडली. लालप्पा रामन्ना गुंडीवाला हा मूळचा तेलंगणाचा रहिवाशी असून सध्या दहिसर येथे राहतो. त्याची साईकिर्ती कन्स्ट्रक्शन नावाची कामगार पुरविण्याची एक कंपनी आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते बांधकाम साईटवर कामगार पुरविण्याचे काम करतात. त्यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यातील कामगार नोकरीसाठी येतात. त्यानंतर मागणीनुसार ते कामगारांना संबंधित बांधकाम साईटवर कामासाठी पाठवत होते. गेल्या दिड वर्षांपासून कांदिवलीतील चारकोप परिसरात रामविजय सोसायटीच्या पुर्नविकासाचे काम सुरु आहे. या ठिकाणी त्यांचे कामगार कामाला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित इमारतीचे बांधकाम बंद होते. एक महिन्यांपूर्वीच पुन्हा काम सुरु असल्याने त्यांचे नऊ कामगार तिथे काम करत होते. त्यापैकी हिमेंद्री आणि तिचे पती दसा राणा हे गेल्या एक वर्षांपासून तिथे कामाला होते. दसाला दारु पिण्याचे व्यसन होते, त्यातून त्याचे त्याच्या पत्नीसोबत सतत खटके उडत होते. रविवारी रात्री एक वाजता दसाने हिमेंद्रीकडे गावी जाण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र तिच्याकडे पैसे नसल्याने तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादातून दसाने त्याची पत्नी हिमेंद्रीची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. या माहितीनंतर लालप्पा गुंडीवाला हे घटनास्थळी रवाना झाले होते.
यावेळी हिमेंद्रीच्या मुलाने त्याच्याच वडिलांनी आईला पैशांवरुन मारहाण करुन तिची कपड्याने गळा आवळून हत्या केल्याचे सांगितले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी हिमेंद्रीला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी लालप्पा गुंडीवाला यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दसा राणा याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.