कांदिवलीत 67 वर्षांच्या वयोवृद्ध व्यावसायिकाची हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या दोन्ही मारेकर्याचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 सप्टेंबर 2025
मुंबई, – कांदिवलीतील कार्यालयात प्रवेश करुन दोन अज्ञात व्यक्तींनी मोहम्मद आयुब मोहम्मद युनूस सय्यद या 67 वर्षांच्या वयोवृद्ध व्यावसायिकाची गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी दोन्ही मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या दोन्ही मारेकर्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी शोध सुरु केला आहे. सकाळी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना रविवारी 21 सप्टेंबरला सकाळी अकरा ते पावणेबाराच्या सुमारास कांदिवलीतील चारकोप, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेटच्या 43 सी. अॅण्ड डी कंपनीच्या कार्यालयात घडली. मोहम्मद हबीब सय्यद हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालवणीतील म्हाडा, मालवणी वैशाली सहकारी सोसायटीमघ्ये राहतात. मोहम्मद आयुब हे त्यांचे वडिल असून ते त्यांच्या आईसोबत मालाडच्या लिंक रोड शिवधाम सोसायटीमध्ये राहतात. त्यांची वसई येथे ए-फोर टेक्नोकास्ट नावाची एक मेटल कास्टिंग तर त्यांच्या वडिलांची सनवर्मल दुर्गादत्त नााची ग्लास टफनिंग करण्याची कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय कांदिवलीतील चारकोप, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेटम्ये आहे. याच कंपनीचे व्यवहार त्यांच्यासह त्यांचा लहान भाऊ हनीफ सय्यद पाहतात.
गेल्या एक महिन्यांपासून त्यांची कंपनी आहे. त्यामुळे त्यांनी ती जागा भाड्याने देण्याचा व्यवहार सुरु केला होता. रविवारी सकाळी अकरा वाजता मोहम्मद आयुब हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात आले होते. याच दरम्यान तिथे दोन अज्ञात तरुणांनी प्रवेश केला होता. त्यांच्या वडिलांशी काही वेळ चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात ते रक्तबंबाळ झाले होते. या हल्ल्यानंतर ते दोघेही तेथून पळून गेले. हा प्रकार त्यांच्या कंपनीत काम करणार्या सुरेशकुमार लोधी याच्या लक्षात येताच त्याने सय्यद कुटुंबियांसह चारकोप पोलिसांना ही माहिती दिली.
घटनास्थळी गेलेल्या चारकोप पोलिसांनी रक्तबंबाळ झालेल्या मोहम्मद आयुब यांना कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मोहम्मद हबीब यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.