मृतावस्थेत सापडलेल्या महिलेची हत्या झाल्याचे उघड
चार वर्षांपूर्वीची घटना; पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – राहत्या घरी मृतावस्थेत सापडलेल्या महिलेची हत्या झाल्याचे उघडकीस आली आहे. काश्मिरा जिग्नेश दोशी असे या ४३ वर्षांच्या महिलेचे नाव असून तिची तिचा पती जिग्नेश जितेंद्र दोशी यानेच हत्या करुन नंतर त्याने आत्महत्या केली होती. शवविच्छेदन अहवालात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चार वर्षांनी कांदिवली पोलिसांनी जिग्नेश दोशीविरुद्ध हत्येसह आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २५ ऑगस्टला रात्री अकरा ते २६ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी साडेदहा वाजता कांदिवलीतील डहाणूकरवाडी, सुनिता अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ९०३ मध्ये जिग्नेश हा त्याची पत्नी काश्मिरा आणि सतरा वर्षांचा मुलगा पार्थ यांच्यासोबत राहत होता. बुधवारी २६ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी साडेसहा वाजता पार्थ हा त्याच्या बेडरुममधून बाहेर आला, यावेळी त्याला त्याचे आई-वडिल दिसले नाही. त्यामुळे तो दुसर्या बेडरुममध्ये गेला, तिथेच त्याला त्याची आई काश्मिरा ही बेडवर निचपित पडल्याचे दिसून आली, तिची काहीच हालचाल नव्हती. त्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना पाहण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याला बाथरुम आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने लाथेने दरवाजा तोडून आत पाहिले असता त्याचे वडिल जिग्नेश यांनी शॉपरच्या लोखंडी नळाला कापडी बेल्टने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेने तो प्रचंड घाबरला आणि त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली. ही माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या दोघांना पोलिसांनी शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे काश्मिरा आणि जिग्नेश या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनास्थळी पोलिसांना एक सुसायट नोट सापडली होती. त्यात त्यांनी आर्थिक कारणावरुन आम्ही आत्महत्या करीत आहोत, त्यास कोणीही जबाबदार नाही असे नमूद केले होते. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अंतिम अहवाल गुरुवारी ८ ऑगस्ट २०२४ रोजी कांदिवली पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात जिग्नेशने त्याची पत्नी काश्मिराची कापडी पट्ट्याने गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर त्याने त्याच्या हाताची नसा कापून आणि नंतर कपड्याने गळाला फास घेऊन आत्महत्या केली होती. अहवालात ही बाब उघडकीस आल्यानंतर जिग्नेशविरुद्ध आता पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याने त्याचा अहवाल लवकरच लोकल कोर्टात सादर केला जाणार आहे.