दुकान खाली करत नाही म्हणून व्यापार्यावर पाईपने प्राणघातक हल्ला
कांदिवलीतील घटना; हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत व्यापार्याला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ मार्च २०२४
मुंबई, – वारंवार विनंती करुनही दुकान खाली करत नाही म्हणून रागाच्या भरात एका व्यापार्याने दुसर्या व्यापार्याच्या डोक्यात पाईपने प्राणघातक हल्ला केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. या हल्ल्यात विकास भवरलाल बाफना (४५) हा ज्वेलर्स व्यापारी गंभीररीत्या जखमी झाला. त्यांच्यावर अमर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहेत. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या प्रविण धीरजलाल मकवाना या आरोपी व्यापार्याला काही तासांत कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.
ही घटना शनिवारी ९ मार्चला दुपारी बारा वाजता कांदिवलीतील मथुरादास रोडवरील प्रितम ज्वेलर्स दुकानात घडली. प्रविण मकवाना हा ज्वेलर्स व्यापारी असून त्याच्याच मालकीचे प्रितम ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते दुकान त्याने चालविण्यासाठी त्यांचा मित्र विकास बाफना यांना दिले होते. या दुकानाची त्यांना विक्री करायची होती, त्यामुळे त्यांनी विकासला दुकान खाली करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांच्यातील आर्थिक व्यवहार पूर्ण केल्याशिवाय दुकान खाली करणार नाही असा पवित्रा विकासने घेतला होता. त्यातून त्यांच्यात वाद सुरु होता. शनिवारी दुपारी बारा वाजता प्रविण मकवाना हा प्रितम ज्वेलर्स दुकानात आला. काही कळण्यापूर्वीच त्याने विकास यांच्या डोक्यात जड पाईपने जोरात प्रहार केला. त्यात ते जागीच कोसळले. हा प्रकार लक्षात येताच तिथे उपस्थितांनी रक्तबंबाळ झालेल्या विकास यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते.
ही माहिती समजताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीच्या जबानीवरुन पोलिसांनी प्रविण मकवाना याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना काही तासांत पळून गेलेल्या प्रविणला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच विकास यांच्या डोक्यात जड पाईपने प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याल पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. दुकान खाली करण्याच्या वादातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.