मंदिराच्या मालकी हक्कावरुन एकाच कुटुंबातील तिघांवर हल्ला

हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत पिता-पूत्रांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जानेवारी २०२५
मुंबई, – मंदिराच्या मालकी हक्काच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर त्यांच्याच परिचिताने लाकडी बांबूसह तिक्ष्ण हत्याराने वार करुन प्राणघातक हल्ला केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात योगेश गौतम शिंदे, रोहिणी गौतम शिंदे आणि गौरेश असे तीनजण जखमी झाले असून त्यांच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत पिता-पूत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनिल भोईर, सुरज सुनिल भोईर, साहिल सुनिल भोईर अशी या तिघांची नावे असून हल्ल्यानंतर ते तिघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही घटना रविवारी रात्री उशिरा दिड वाजता कांदिवलीतील साईनगर, हेरीटेज इमारतीमध्ये घडली. या इमारतीच्या रुम क्रमांक ४०८ मध्ये मीना गौतम शिंदे ही ६२ वर्षांची वयोवृद्ध महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच इमारतीमध्ये भोईर कुटुंबिय राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. याच परिसरात एक मंदिर असून या मंदिराच्या मालकी हक्कावरुन काही दिवसांपासून शिंदे आणि भोईर कुटुंबियांमध्ये वाद सुरु होता. रविवारी रात्री याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून सुरजने मीना हिचा मुलगा योगेश, मुलगी रोहिणी आणि जावई गौरेश या तिघांनाही आता तुम्हाला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली होती. त्यानंतर सुरजने सुनिल आणि साहिल या दोघांच्या मदतीने या तिघांवर लाकडी बांबूसह तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता.

या हल्ल्यात ते तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. योगेश आणि रोहिणीच्या छातीवर आणि गौरेशच्या कमरेला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या तिघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मीना शिंदे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र ते तिघेही पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page