एकाच कुटुंबातील तिघांवर हल्ला करणार्‍या त्रिकुटास अटक

मंदिराच्या मालकी हक्कावरुन दोन्ही कुटुंबात वाद होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जानेवारी २०२५
मुंबई, – मंदिराच्या मालकी हक्काच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला करुन पळून गेलेल्या पिता-पूत्रांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. सुनिल गणपत भोईर, सुरज सुनिल भोईर, साहिल सुनिल भोईर अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच हल्ल्यात योगेश गौतम शिंदे, बहिण रोहिणी गौतम शिंदे आणि भावोजी गौरेश असे तीनजण जखमी झाले असून त्यांच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मंदिराच्या मालकी हक्कावरुन या दोन्ही कुटुंबात वाद होता. त्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही घटना रविवारी १९ जानेवारीला रात्री उशिरा दिड वाजता कांदिवलीतील साईनगर, हेरीटेज इमारतीमध्ये घडली. या इमारतीच्या रुम क्रमांक ४०८ मध्ये मीना गौतम शिंदे ही ६२ वर्षांची वयोवृद्ध महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच इमारतीमध्ये भोईर कुटुंबिय राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. याच परिसरात एक मंदिर असून या मंदिराच्या मालकी हक्कावरुन काही दिवसांपासून शिंदे आणि भोईर कुटुंबियांमध्ये वाद सुरु होता. रविवारी रात्री याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून सुरजने मीना हिचा मुलगा योगेश, मुलगी रोहिणी आणि जावई गौरेश या तिघांनाही आता तुम्हाला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली होती. त्यानंतर सुरजने सुनिल आणि साहिल या दोघांच्या मदतीने या तिघांवर लाकडी बांबूसह तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता.

या हल्ल्यात ते तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. योगेश आणि रोहिणीच्या छातीवर आणि गौरेशच्या कमरेला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या तिघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मीना शिंदे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना सुनिल भोईर व त्याचे दोन मुले साहिल आणि सुरज भोईर या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांना दुसर्‍या दिवशी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page