इमिटेशन व्यापार्‍याच्या घरी ९.३९ लाखांची चोरी

चोरीनंतर पळून गेलेल्या कारागिराला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – कांदिवलीतील एका इमिटेशन ज्वेलरी बनविणार्‍या व्यापार्‍याच्या घरातून ९ लाख ३९ हजाराची कॅश चोरी करुन पळून गेलेल्या कारागिराला गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा दिवसांत कांदिवली पोलिसांनी अटक केली. साबीर मोहम्मद हद्दीश अली असे या ३३ वर्षीय कारागिराचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीची कॅश लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रियाज अहमद शेख हे कांदिवली परिसरात राहत असून त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. त्यांच्या घराच्या तळमजल्यावरच इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचा कारखाना आहे. याच कारखान्यात तीन कामगार कामाला असून दिवसभर काम करुन ते रात्री कारखान्यातच झोपतात. त्यापैकी साबीर हा त्यांच्याकडे गेल्या पंधरा वर्षांपासून कामाला होता. काही दिवसांनी त्यांच्या बहिणीच्या मुलाने त्याच्या मालकीचा मालवणीतील घराची विक्री केली होती. या विक्रीतून त्याला पंधरा लाख रुपये मिळाले होते. त्यापैकी नऊ लाख रुपये त्यांनी रियाज शेख यांच्याकडे दिली होती. या रक्कमेसह व्यवसायाची ३९ हजाराची कॅश त्यांनी त्यांच्या घरातील बेडच्या आत बॅगेत ठेवली होती.

२ फेब्रुवारीला ते त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत शिवडी येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. नोकर विश्‍वास असल्याने त्यांनी घराला कुलूप लावला नव्हता. ५ फेब्रुवारीला त्यांना कामानिमित्त पैशांची गरज होती. त्यामुळे बेडमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे ९ लाख ३९ हजाराची कॅश नव्हती. सगळीकडे शोध घेतल्यानंतर त्यांना कॅश कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कामगाराकडे चौकशी केली होती. यावेळी त्यांनी त्यांना कॅशबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यांनी साबीरची चौकशी केली असता तो अचानक गावी निघून गेल्याचे समजले.

साबीर त्यांना काहीही न सांगता गावी निघून गेल्याने त्यांनीच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या साबीरचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच पळून गेलेल्या साबीरला तीन दिवसांपूर्वी कांदिवली पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून चोरीची कॅश लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page