कांदिवली येथे 20 वर्षांच्या तरुणीवर मित्राकडून चाकूने हल्ला
मित्रासोबत रिलेशनशीपमध्ये राहण्यास नकार दिला म्हणून हल्ला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2025
मुंबई, – विवाहीत मित्रासोबत रिलेशनशीपमध्ये राहण्यास नकार दिला म्हणून एका 20 वर्षांच्या तरुणीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. या हल्ल्यात ही तरुणी जखमी झाल्याने तिच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या हल्लेखोर मित्राला कांदिवली पोलिसांनी अटक केली. इम्रान अहमद हुसैन चौधरी असे या 30 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. इम्रान हा मालाडच्या मालवणी परिसरात रात असून त्याचा रेती व सिमेंट विक्रीचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता कांदिवलीतील एकतानगर, गल्ली क्रमांक सातमध्ये घडली. याच परिसरात सलमा ही कांदिवली येथे राहत असून घरकाम करते. तिचा इम्रान हा मित्र असून त्यांच्यात पूर्वी मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र नंतर इम्रानने दुसर्या तरुणीशी लग्न केले होते. लग्नानंतरही तो तिच्या संपर्कात होता. तिने त्याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये राहावे यासाठी तो तिच्यावर दबाव आणत होता. मात्र तिने त्याच्याशी रिलेशनशीपमध्ये राहण्यास नकार दिला होता. त्याचा त्याच्या मनात राग होता. गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता सलमा ही घरात एकटीच होती. यावेळी तिथे इम्रान आला आणि त्याने तिला पुन्हा रिलेशनशीपबाबत विचारणा केली होती. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम असल्याचे लक्षात येताच त्याने तिला बेदम मारहाण केली. घरातील चाकूने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तिच्या गालाला, मानेला आणि मनगटाला गंभीर दुखापत झाली होती.
हल्ल्यानंतर इम्रान हा तेथून पळून गेला होता. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने जखमी झालेल्या सलमाला जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच तिच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. ही माहिती समजताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सलमाची जबानी नोंदविल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी इम्रानविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या इम्रानचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना काही तासांत त्याला मालवणी येथून अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.