मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2025
मुंबई, – कांदिवलीतील एका व्यापार्याच्या घरातून सुमारे तेरा लाखांचे सोळा किलो चांदीचे बिस्कीट चोरीस गेले आहे. मिसिंग झालेल्या नोकरानेच ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस येताच व्यापार्याने नोकराविरुद्ध कांदिवली पोलिसांत चोरीची तक्रार केली आहे. याप्रकरणी महादेव गोचंद्र दोलाई या नोकराविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. 32 वर्षांपासून प्रामाणिकपणे घरकाम करणार्या नोकरानेच फ्लॅटमध्ये दुरुस्तीचे काम करताना हातसफाई केल्याने व्यापार्यासह त्याच्या कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला होता.
जिगर अशोक नथवाणी हे व्यापारी असून ते कांदिवलीतील एस. व्ही रोड, मिथिला अपार्टमेंटमध्ये राहतात. याच इमारतीमध्ये त्यांचे वयोवृद्ध सासरे हसमुख तन्ना, सासू प्रविण तन्ना, त्यांच्या पत्नीची आत्या जया तन्ना हे तिघेजण राहतात. त्यांचा स्वतचा हॅण्ड्स इन टेक्नोलॉजी नावाचे कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे गेल्या 32 वर्षांपासून महादेव दोलाई हा घरकाम करतो. त्यांच्या पत्नीची आत्या जया तन्ना या काही महिन्यांपासून आजारी असल्याने तिने 10 ऑक्टोंबर 2024 रोजी तिच्याकडील तेरा लाख रुपयांच्या सोळा किलो विविध आकार आणि वजनाचे चांदीचे बिस्कीट त्यांच्या तीन भावाच्या तीन मुलींना म्हणजे त्यांची पत्नी जेसल जिगर नथवाणी, मेहुणी धर्मिशा जिगर मोकाशी आणि उर्वशी कर्नर ठाकर यांना समप्रमाणात वाटप केली होती.
चांदीचे बिस्कीट त्यांच्या पत्नीने तिच्या आई-वडिलांच्या कपाटात सुरक्षित ठेवले होते. याच दरम्यान त्यांच्या फ्लॅटचे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. यावेळी तिथे कामगार येत असल्याने त्याची सर्व जबाबदारी त्यांनी महादेव दोलाईकडे सोपविली होती. त्यामुळे फ्लॅटसह कपाटाची चावी त्याच्याकडे होती. तो 32 वर्षांपासून त्यांच्याकडे कामाला असल्याने त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. फेब्रुवारी महिन्यांत जया तन्ना यांचे निधन झाले होते. त्यानंतर महादेव दोलाई हादेखील अचानक गायब झाला होता. तो परत आला नाही. त्यामुळे त्यांनी महादेवच्या मिसिंगची तक्रार पोलिसांत तक्रार केली होती.
जयाच्या निधनानंतर सर्व विधी झाल्यानंतर त्यांनी कपाटातील चांदीच्या बिस्कीटाची पाहणी केली असता त्यात बिस्कीट नव्हते. यावेळी त्यांना महादेव दोलाई हा मिसिंग झाला नसून त्याने चांदीचे बिस्कीट चोरी करुन घरातून पलायन केल्याची खात्री झाली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार कांदिवली पोलिसांना सांगून त्यांचा नोकर महादेव दोलाई याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी त्याच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला होता. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.