मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचे पेमेंट न करता एका व्यावसायिकाची एक कोटी सतरा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका खाजगी कंपनीच्या मालक असलेल्या व्यावसायिकाला कांदिवली पोलिसांनी अटक केली. दर्शन भरतकुमार चुडघर असे या व्यावसायिकाचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे सांगितले. या गुन्ह्यांचा त्याचा सहकारी पार्टनर विक्रम ओमप्रकाश श्रीवास्तव ऊर्फ विकी याचा सहभाग असून त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
जीतनारायण हरिबहादूर प्रधान हे कांदिवली परिसरात राहत असून त्यांची क्रिस्टल टेक्नोलॉजी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी आयटी हार्डवेअर-सॉफ्टवेअर पार्ट पुरवठादार म्हणून काम करते. गेल्या आठ वर्षांपासून ते डेल, एचपी, लिनोव्हो, एसर, एसुस आणि इतर कंपन्यांचे लॅपटॉप, संगणकासह इतर साहित्य विविध कंपन्याच्या माध्यमातून होलसेलमध्ये विक्री करतात. एप्रिल 2023 रोजी त्यांची पद्मावती इंटरप्रायजेस मालक विक्रम श्रीवास्तवशी ओळख झाली होती. याच कंपनीत दर्शन चुडघर हा पार्टनर म्हणून काम करत होता. त्यांनी त्यांच्या कंपनीसोबत व्यवसाय सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता, मात्र नंतर त्यांनी त्यांच्या कंपनीसोबत व्यवहार सुरु केला होता. त्यानंतर जीतनारायण प्रधान यांनी पद्मावती इंटरप्रायजेस कंपनीला 1 कोटी 54 लाख 38 हजाराचे विविध कंपनीचे लॅपटॉप, संगणक, हिकव्हिजन सीसीटिव्ही कॅमेरा, डीव्हीआर, एनव्हीआर, स्टोरेज, हार्ड ड्राईव्ह आदी साहित्य पाठवून दिले होते. त्यापैकी 36 लाख 77 हजार रुपयांचे पेमेंट कंपनीने केले, मात्र उर्वरित रक्कमेचे एक कोटी सतरा लाख रुपयांचे धनादेश बँकेत न वटता परत आले होते. याबाबत कंपनीने विक्रम श्रीवास्तव आणि दर्शन चुडघर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी गोरेगाव येथील कंपनीत जाऊन पाहणी केली असता तिथे दुसर्या कंपनीचे कार्यालय असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चौकशीअंती या दोघांनी अशाच प्रकारे पुण्यातील एका कंपनीकडून दिड ते दोन कोटीचे साहित्य घेऊन त्यांचे पेमेंट केले नव्हते. या दोघांनी मुंबईसह पुणे आणि इतर शहरात अशाच प्रकारे गुन्हे केले होते. विश्वास संपादन करुन क्रेडिटवर इलेक्ट्रॉनिक साहित्य घेतल्यानंतर ते दोघेही पळून जात होते. या दोघांनी तक्रारदारांची अशा प्रकारे त्यांनी 1 कोटी 17 लाख रुपयांचे पेमेंट न करता कंपनीची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विक्रम श्रीवास्तव अणि दर्शन चुडघर या दोन्ही व्यावसायिकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश कांदिवली पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर आरोपींचा पोलिसाकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना तीन दिवसांपूर्वी दर्शन चुडघर याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीतून फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.