मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑगस्ट 2025
मुंबई, – कांदिवलीतील सुरक्षा पार्कजवळ मंगळवारी रात्री उशिरा सात महिन्यांचे एक मृत अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या अर्भकाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बोरिवलीतील प्रेमनगर परिसरात बाबाजी गंगाराम हरम हे राहत असून ते सध्या बोरिवली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी ते रात्रपाळीवर कर्तव्यावर हजर झाले होते. रात्री उशिरा ते त्यांच्या सहकार्यासोबत गस्त घालत होते. यावेळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून त्यांना एक कॉल आला होता. त्यात कांदिवलीतील एम. जी क्रॉस रोड, भूतनगर, युनियन बॅकेजवळील सुरक्षा पार्क एकजवळ एक नवजात अर्भक पडले असून पोलीस मदतीची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे ते त्यांच्या सहकार्यासोबत घटनास्थळी गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना एक सहा ते सात महिन्यांचे नवजात अर्भक दिसले. ते अर्भक कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
प्राथमिक तपासात सात महिन्यांच्या या अर्भकाचा गर्भपातामुळे मृत्यू झाला होता, त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला सुरक्षा पार्कजवळ टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच बाबासाहेब हरम यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत कांदिवली पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीची ओळख पटवून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.